लहान सौरउर्जा प्रकल्पही मोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे
‘लहान सौरउर्जा प्रकल्पही मोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे’
मनपा आयुक्त अभिनव गोयल यांचे प्रतिपादन
केडीएमसीच्या १४ शाळांमधील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) ः छोटे छोटे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पही मोठमोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. लोकसहभागातून महापालिकेच्या १४ शाळांवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे मंगळवारी (ता. २७) आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी ते बोलत होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढत चालले आहेत. पारंपरिक ऊर्जास्रोतांची उपलब्धता पाहता सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे लक्ष्य गाठता येणार नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात आलेले हे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प यामध्ये खारीचा वाटा उचलतील, असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती, संस्था, बांधकाम विकसक आणि इलेक्ट्रिक संघटनांचे आयुक्तांनी आभार मानले. तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी २५ लाखांहून अधिक खर्च
महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील १४ शाळांमध्ये ५० किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले. त्यासाठी २५ लाखांहून अधिक खर्च आला. हे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी रिजेन्सी ग्रुप, वैष्णवी बिल्डकोन, कल्याण रनर्स ग्रुप, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, मोहन खेडा ग्रुप, स्वामी नारायण लाइफ स्पेसेस, थारवानी इन्फ्रा, बिर्ला वन्य, वेस्ट पायोनियर यांच्यासह मे. एस. एस इलेक्ट्रिल वर्क्स, जे. डी. इलेक्ट्रिल वर्क्स, मे. एस. एस. इलेक्ट्रिक कंपनी, एमजी इलेक्ट्रिक अँड कंपनी, टॉप इलेक्ट्रिकल, आशीर्वाद इलेक्ट्रिकल, त्रिमूर्ती एंटरप्रायजेस, रॉयल इलेक्ट्रिकल, किरण इलेक्ट्रिकल, इंटरफेस डिजिटल, एअरटेक सोल्युशन, नेहल प्रॉपर्टी, मल्हार इलेक्ट्रिक वर्क्स, तुषार इलेक्ट्रिकल, के. बी. इलेक्ट्रिकल अँड कंपनी आणि कल्याण इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, एमसीएचआयचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण हे महापालिकेच्या इतर १६ शाळांमध्ये सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची जबाबदारी घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले.
वीज बचतीचा संदेश घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचेही आयुक्तांच्या हस्ते अनावरण केले. या कार्यक्रमाला शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव, रमेश मिसाळ, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

