पुण्यातून आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या

पुण्यातून आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या

Published on

पुण्यातून आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या
घाटकोपरमध्ये परिसरात चोरी करून व्हायचा पसार
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पुण्यात गेलेल्या एका सोनसाखळी चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आकाश लोखंडे असे त्याचे नाव असून, ही कारवाई परिमंडळ सातमधील मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्कसाईट, घाटकोपर तसेच पंतनगर या आठ पोलिस ठाण्यांतील पोलिसांनी केली.
परिमंडळ सातचे पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हा आरोपी दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करून पुण्यात पसार झाला होता. याबाबत घाटकोपर पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा एक गुन्हा २० मे रोजी रात्री दाखल झाला होता. यातील फिर्यादी रंजना प्रकाश घुटुगडे या घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी येथे घरी पायी चालत जात असताना आर. बी. कदम, वाघडवाला लेन, पाणी खात्याच्या गेटजवळ आरोपीने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली होती. घाटकोपर पोलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि परिमंडळ सातमधील विविध आठ पोलिस ठाण्यांचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी घटनास्थळी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील ३५० पेक्षा जास्त सरकारी व खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपी आकाश लोखंडे हा गुन्हा करण्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास पंतनगर रेल्वे पोलिस वसाहतीलगतच्या अदाणी रिॲलीटी या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका महिलेसह दुचाकीवरून घाटकोपर रेल्वेस्थानक येथे गेल्याचे दिसले. पोलिसांनी महिलेचा तांत्रिक तपास केला असता ती रिक्षामध्ये बसून गेल्याचे दिसले.
पोलिसांनी त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन या महिलेस भटवाडी या ठिकाणी सोडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी भटवाडी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तिला मार्केटमध्ये किराणा दुकानात खरेदी करताना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये तिच्यासोबत असलेला दुचाकीस्वार हा तिचा मित्र आकाश भगवान लोखंडे (भटवाडी) असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी हा शिरोली ता. आंबेगाव, जि. पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्या ठिकाणी जात पोलिसांनी एमआयडीसी पेट्रोलपंपावरून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com