आपत्ती रोखण्यासाठी पालिकेचा आराखडा

आपत्ती रोखण्यासाठी पालिकेचा आराखडा

Published on

आपत्ती रोखण्यासाठी पालिकेचा आराखडा
वैद्यकीय कवच, मालमत्ता व नागरिकांना देणार सुरक्षा
वसई, ता. २७ (बातमीदार) : ठाणे, मुंबई शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच आता उपनगर असलेल्या वसई-विरार शहरातदेखील पावसाचे आगमन झाले आहे. यादरम्यान पावसाळ्यातील आपत्तीला रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने आराखडा तयार केला आहे. नागरिकांना सुरक्षेची हमी व आरोग्य कवच देण्यात येणार आहे.

जोरदार वारा, पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग कोसळणे, इमारतीचे छत, स्लॅब कोसळणे किंवा अन्य हानी निर्माण होणे, अशा घटना घडत असतात. यामुळे काही वेळा जीवित व वित्तहानीदेखील होत असते. त्यामुळे महापालिकेने आपत्ती यंत्रणा सज्ज केली आहे. महापालिकेच्या एकूण नऊ प्रभागांत मदत कक्ष २४ तास सेवा देणार आहे. एकाच ठिकाणी राहणाऱ्या वस्तीत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. मिठागर परिसरासह डोंगराळ भागात अनेकदा घरे रिकामी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याच्या घटना या पावसाळ्यात घडल्या आहेत. अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना पावसाळ्यात महापालिकेतर्फे तात्पुरत्या निवारा केंद्राची व्यवस्था प्रत्येक प्रभागात केली जाणार आहे.

पावसाळ्यात वसईची तुंबई होत असते, त्यामुळे इमारती, रस्ते पाण्याखाली जातात, वाहतूक व्यवस्था कोलमडते. याचा परिणाम हा वाहनचालक, सर्वसामान्य नागरिकांवर होत असतो. सखल भागात पाण्याचा निचरा त्वरित होत नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. त्यामुळे यंदा महापालिकेने सक्शन मशीन, कर्मचारी तसेच सखल भागातील पाहणी याकडे लक्ष वळवले आहे. पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी लक्ष देण्यात येणार आहे. आपत्तीजन्य परिस्थितीत उपाययोजनेसाठी आराखडा तयार केला असला तरी याची अंमलबजावणी किती यशस्वी होणार हे पावसाळ्यात समोर येणार आहे.

पूरजन्य परिस्थितीत अनेकदा नागरिक इमारत परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळांवर अडकून राहतात. गावांनादेखील धोका निर्माण होतो. अशावेळी नागरिक आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात फायबर बोटी, गॅस डिटेक्टर, फ्लोटिंग पंप, राहण्याची व्यवस्था, लाइफ जॅकेट, जीव रक्षकासह जेवण अशी व्यवस्था केली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यातील संपर्क क्रमांक, मदत केंद्र यासह अनेक उपयुक्त माहिती असणारी यादीदेखील जाहीर केली आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मदत मिळणे सहज शक्य होणार आहे.

वसई-विरार शहर महापालिकेने रुग्णालय, जलतरणपटू, घनकी कचरा व्यवस्थापन, विद्युत विभाग, अग्निशमन दल, वृक्षप्राधिकरण, बांधकाम विभाग ठेकेदार, पाणीपुरवठा व परिवहन संबंधित विभागातील अधिकारी, अभियंता आदींची नावे व संपर्क क्रमांकदेखील जाहीर केला आहे.

वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. पावसाळ्यात अनेक परिसर पाण्याखाली जातात, त्यामुळे विजेचा लपंडाव, डासांचा प्रादुर्भाव आणि अन्य गैरसोयींचा सामना रहिवाशांना, व्यापारीवर्गाला करावा लागत असतो. आपत्ती काळात योग्य त्या उपाययोजना करून पावसाळ्यात दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.
- महेश सरवणकर, अध्यक्ष, वसई रोड मंडल, भाजप

महापालिकेत समाविष्ट असलेल्या गावांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. अनेक भागात जलमय परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने गावपातळीवर पाहणी करून पाण्याचा निचरा योग्यरितीने व्हावा व वाहतूक सुरळीत असावी, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून गावातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
- समीर वर्तक, अध्यक्ष, पर्यावरण विभाग काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com