सीबीडी बेलापूर गाळात

सीबीडी बेलापूर गाळात

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : सीबीडी-बेलापूर नोडचे पाणी समुद्रात वाहून घेऊन जाणाऱ्या जलधारण तलावाच्या कामाकडे केलेले दुर्लक्ष नवी मुंबई महापालिका प्रशासनाला चांगलेच भोवले. सोमवारी (ता. २६) झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलापूर नोड पाण्याखाली गेला होता. हे पाणी सोमवारी रात्री उशिरा ओसरले तर काही भागांत मंगळवारी दुपारपर्यंत रस्त्यांवर पाणी होते. पाणी ओसरल्यानंतर सीबीडी सेक्टर-४मधील मार्केट, सेक्टर ११च्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हा गाळ संध्याकाळपर्यंत स्वच्छ करण्यात आलेला नव्हता.
सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच सीबीडी सेक्टर ११मधील रस्ते पाण्याखाली गेले. सीबीडीतील कोकण भवन परिसर हा दरवर्षी पाण्याखाली जातो. यंदाही कोकण भवन परिसरासहित रेल्वेचा भुयारी मार्ग, नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची जुनी इमारत, बँक ऑफ इंडिया मुख्यालयासमोरील रस्ता, ॲक्सिक बँक, आयडीबीआय बँकेसमोरील रस्त्यावर साचलेले पाणी ओसरण्यात तब्बल १२ तासांहून अधिक वेळ लागला. रायगड भवनसमोरच्या रस्त्यावर आलेले पाणी मंगळवारी सकाळनंतरही काही प्रमाणात होते. जलधारण तलावाकडे जाणारे नाले आणि गटारे गाळाने भरले असल्याने पावसाचे पाणी अद्याप साचून आहे. महापालिकेने पावसाच्या तोंडावर केलेली विकासकामे आणि काँक्रीटीकरणामुळे गटारे आणि नाल्यात गेलेला गाळ वेळेवर स्वच्छ न केल्यामुळे बेलापूरचा परिसर पाण्याखाली गेल्याची चर्चा नवी मुंबईतील नागरिकांकडून केली जात आहे.
--------------
शेकडो वाहने पाण्यात
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीबीडी-बेलापूर सेक्टर १, २ आणि ४ या भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. या भागात नागरिकांनी उभी केलेली चारचाकी वाहने पाण्यात बुडाली होती. सीबीडी सेक्टर ११ येथे बँक ऑफ इंडिया मुख्यालयासमोरील रस्ता, ॲक्सिस बँक, आयडीबीआय बँक आणि सीबीडी रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेली चारचाकी वाहने पाण्यात बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
---------------
दुसऱ्या दिवशी दुपारनंतर गाळ स्वच्छ
पावसाचे पाणी ओसरण्यास बऱ्याच तासांचा अवधी लागल्यानंतर आता रस्त्यावर गाळ साचलेला आहे. रस्त्याकडेला पदपथांजवळ पावसाचे पाणी गुडघाभर साचले होते. काही भागांतील पाणी ओसरण्यास मंगळवारची सकाळ उजाडली. त्यामुळे या भागात चिखल आणि गाळाचे साम्राज्य पसरले आहे. सीबीडी सेक्टर ४मधील मार्केटमधील मोकळ्या भागातही गाळ पसरलेला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळ स्वच्छ केला.
------------
रायगड भवनात अडकलेल्या अधिकाऱ्यांची सुटका
सीबीडी सेक्टर ११ येथे रायगड भवनच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रायगड भवनमध्ये कार्यरत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची वाहने अडकून पडली होती. या अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी एनएमएमटी बस पाठवण्यात आली होती; मात्र ती बससुद्धा पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन त्या अधिकाऱ्यांची सुटका केली. तसेच बँक ऑफ इंडिया मुख्यालयात अडकलेल्या अधिकाऱ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com