ठाण्यात अकरावी प्रवेशाचा गोंधळ
ठाण्यात अकरावी प्रवेशाचा गोंधळ
संकेतस्थळाच्या संथगतीने विद्यार्थी, पालक हैराण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : अकावी प्रवेशाचा सुरू असलेला गोंधळ थांबता थांबत नसल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. निकालानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट हाती येण्यास आधीच विलंब झाला आहे. त्यात सोमवारपासून नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संकेतस्थळाच्या संथगतीमुळे अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी तब्बल एक लाख ५६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातून सुमारे एक लाख आठ हजार विद्यार्थी दहावी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत; मात्र कटऑफ लिस्टमुळे मुबलक जागा असूनही विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ३२८ विद्यार्थ्यांपैकी एक लाख आठ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १४ मे रोजी निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी १९ मेपासून सुरुवात होणार होती, पण राज्य सरकारचे पोर्टल बंद पडल्याने ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार आता ही प्रक्रिया २६ मेपासून सुरू झाली आहे. पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मार्कशीट, रिझल्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्याचे उघडकीस आले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या हाती संकेतस्थळावर नोंदणी करण्याच्या दिवशी रिझल्ट हाती आला. त्यात शासनाने दिलेल्या संकेतस्थळाची गती मंदावल्यामुळे पहिल्या दिवशी प्रवेश नोंदणीला ठाणे जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आहे; मात्र कोणत्या महाविद्यालयात कोणत्या विभागात किती जागा आहेत, याची माहिती खुद्द शिक्षण विभागाकडेही नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ही माहिती टाकली नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीही महामुंबई परिक्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे एक लाख ५६ हजार ४४० जागा असल्याची आकडेवारी हाती आली आहे. म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४८ हजार जागा अधिक ठाण्यात आहेत. तर मुंबईमध्ये एक लाख ९८ हजार १७० जागा आहेत. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थी ठाणे शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयांनाही पसंती देणार असल्याचे दिसते. त्यामुळे मुबलक जागा असूनही ठाणेकर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्या शाखेत किती जागा
कला - २५ हजार ८६०
वाणिज्य - ७१ हजार २४०
विज्ञान - ५९ हजार ३४०
मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णत: ऑनलाइन आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज भरून त्या शाखांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
सुधारित वेळापत्रक
२६ मे ते ३ जून नोंदणी व अर्ज सादर
५ जून तात्पुरती गुणवत्ता यादी
६ ते ७ जून हरकती व दुरुस्ती सादर करणे
८ जून अंतिम गुणवत्ता यादी
९ जून कोटा फेरी प्रवेश
११ ते १८ जून पहिली प्रवेश प्रक्रिया
२० जून दुसऱ्या फेरीसाठी जागा
नोंदणी, अर्ज, माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळे
[https://mahafyjcadmissions.in](https://mahafyjcadmissions.in)
mahafyjcadmissions.in
हेल्पलाईन नंबर* ८५३०९५५५६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

