

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. वेळीच योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या; मात्र यापैकी केवळ १३ प्रकरणांमध्ये पती-पत्नीचा समेट घडवून आणण्यात यश आले आहे.
कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाइकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे. जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १०४ जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती १३ जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांसाठीही मदतनीस ठरत आहे. हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविला होता. याला नागपूरकरांचा प्रतिसाद मिळाला. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा अभ्यास करून तक्रारदारांना समुपदेशन करण्यात आले. तक्रारदार व समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. पीडित महिला आणि मुलांना सर्व प्रकारची मदत व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये वैद्यकीय सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशन, कायदेतज्ज्ञ, संरक्षण अधिकारी आणि पुनर्वसन सेवा तत्काळ पुरवल्या जातात. जेणेकरून संकटात सापडलेल्या महिलांना आणि मुलांना त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर करता येते.
तक्रारींची कारणे
धावपळीच्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीला एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणे, सतत मोबाईलचा वापर, एकमेकांमधील गैरसमज ही नवरा-बायकोतील भांडणाची मुख्य कारणे आहेत. यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे.
मदत कक्ष खुला
भरोसा सेल आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास खुले असून १०० हा हेल्पलाइन क्रमांक मदतीसाठी देण्यात आला आहे. भरोसा कक्षात विशेष बालपथक सेवा, ज्येष्ठ नागरिक कक्ष, बडी कॉप, पोलिस काका यांचीही नेमणूक करण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.