जीवघेणा फलाटा वरील रेल्वे रूळ ओलांडून प्रवाशी घालतात जीव धोक्यात.....

जीवघेणा फलाटा वरील रेल्वे रूळ ओलांडून प्रवाशी घालतात जीव धोक्यात.....

Published on

फलाटावरील रेल्वे रूळ ओलांडून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) ः प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाटाच्या दोन्ही बाजूला असलेले रॅम्प तोडून त्याठिकाणी लोखंडी रेलिंग बसविले आहेत. तर काही ठिकाणी भिंतीदेखील बांधल्या आहेत. तरीही प्रवाशांकडून रेलिंग ओलांडून रुळावरून प्रवास सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. या बेशिस्त वागणुकीपुढे रेल्वे प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांनी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा वापर करावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी सुविधा दिल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हार्बर रेल्वेमार्गावरील दिघा ते पनवेल व वाशी ते बेलापूर रेल्वेस्थानकावरील रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवले. तर काही ठिकाणी भिंती बांधल्या असल्या तरीदेखील वेळ वाचवण्याच्या नादात अनेक प्रवासी जीवघेणा प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, रेलिंग ओलांडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या; मात्र त्यास प्रवाशांनी केराची टोपली दाखवली.
हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर आता प्रवाशांची संख्या वाढली आहे; मात्र यावरील सर्वच रेल्वेस्थानक प्रशस्त असून दोन्ही दिशेला चढण्या-उतरण्याची सोय आहे. शिवाय, स्थानकातून बाहेर पडण्यासाठीही प्रशस्त मार्ग आहे. त्यामुळे या स्थानकात आतापर्यंत गर्दीचे चित्र दिसले नाही; मात्र रेल्वे रूळ ओलांडून स्थानकात प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने अपघाताचा धोका वाढतो. रेल्वे रूळ ओलांडताना अनेक अपघातही झाले असून जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांचे समुपदेशन
रूळ ओलांडताना प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करीत त्यांचे समुपदेशन करण्याचे काम रेल्वे पोलिसांद्वारे करण्यात येते. रस्ते सुरक्षा सप्ताहावेळीदेखील अशा प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून गुलाब देऊन समुपदेशन केले जाते; मात्र कारवाईनंतर पुन्हा प्रवाशांकडून असे प्रकार सुरूच आहेत. अशातच रेल्वेस्थानकात आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ जवान असे फक्त तीन ते चार कर्मचारी असतात. अपुऱ्या मनुष्यबळात सर्व ठिकाणी लक्ष देणे आव्हानात्मक असल्याचे रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेल्वे प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. जेणेकरून आर्थिक भुर्दंडाला घाबरून कोणी असा जीवघेणा शॉर्टकट मार्ग अवलंबणार नाही. प्रत्येक स्टेशनला रेल्वे प्रशासनाने पोलिस तैनात ठेवावेत.
- महेश पाटील, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com