‘टीमा’मधील ग्रामीण रुग्णालय कार्यरत राहणार : जिल्हाधिकारी

‘टीमा’मधील ग्रामीण रुग्णालय 
कार्यरत राहणार : जिल्हाधिकारी
Published on

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : पावसाचा हंगाम आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बोईसर ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित करण्यात येऊ नये. असा प्रयत्न टीमा रुग्णालय व्यवस्थापनाने केल्यास तो हाणून पाडू, असा निर्धार करीत विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे भूमिका स्पष्ट करून ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत होईपर्यंत टीमातच ग्रामीण रुग्णालय सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची सद्य:स्थिती कायम ठेवण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

बोईसर येथील टीमा रुग्णालयात बोईसरचे ग्रामीण रुग्णालय कोरोना संपुष्टात आल्यानंतर कार्यरत आहे. त्या रुग्णालयात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसह परिसरातील हजारो गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत. असे असतानाही टीमा रुग्णालय व्यवस्थापनाने बोईसर ग्रामीण रुग्णालय टिमातून रिकामे करावे, असा तगादा जिल्हा आरोग्य विभागाकडे लावला होता. तसेच या जागेचे भाडे १० लाख रुपये द्यावे, अशी मागणीही २७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात बोईसर येथील प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाला परिसरातील नागरिक व कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सुरू झालेल्या पावसाळ्यात या औद्योगिक परिसराला या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले. विंचू तसेच सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना या रुग्णालयातून तातडीने उपचार मिळत असून, हे रुग्णालय कुरगाव, तारापूर, दांडी किंवा अन्य ठिकाणी हलविल्यास नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, असे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले. याप्रसंगी संजय पाटील, जगदीश धोडी, महेंद्र भोणे, समीर मोरे, भावेश चुरी, सचिन लोखंडे, अविश राऊत, परशुराम चावरे आणि बोईसर येथील अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा भूमिअभिलेख नरेंद्र पाटील, एमआयडीसीचे उपभियंता अविनाश संखे आणि इतर सहकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या दृष्टीने पूर्वतयारी
कोरोनाचे शहरी भागात होणारे संक्रमण पाहता पालघर जिल्ह्यातील १२ ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी दिली. तसेच कोरोनासंदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करून नमुने तपासणीसाठी डहाणू अथवा मुंबई येथील कोरोना तपासणी केंद्रांमध्ये पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com