पावसाळी खरेदीची नागरिकांची लगबग

पावसाळी खरेदीची नागरिकांची लगबग

Published on

पावसाळी खरेदीसाठी नागरिकांची लगबग
रंगबिरंगी छत्री, रेनकोट बाजारात दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली असली तरी पुढच्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाची चाहूल लागताच दादर, चेंबूर आणि क्रॉफर्ड मार्केटच्या होलसेल दुकानांमध्ये छत्री आणि रेनकोटच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे विक्रीत मोठी उसळी आली असून, विविध प्रकारच्या आकर्षक व उपयुक्त छत्र्या, रेनकोटसह ऑनलाइन सेवांचाही लाभ ग्राहक घेऊ लागले आहेत.

लहानापासून मोठ्यासाठी रेनकोट, पॉकेट्स छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यावर्षीपेक्षा यंदा छत्री आणि रेनकोटची १० ते २० टक्के किंमत वाढली असली, तरी अगदी परवडणाऱ्या दरात रेनकोट उपलब्ध आहेत. स्‍वतंत्र पँट, जॅकेट, ट्रिपवर जाण्यासाठी मागील कव्हरदेखील उपलब्ध आहेत. चांगला दर्जा आणि परवडणारी किंमत घेऊन विक्रेते बाजारात दाखल झाले आहेत.

मुंबईच्या पावसातून वाचायले असेल तर छत्री, रेनकोट, पोंचो अशा गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. चेंबूर स्थानकाबाहेरील बाजारातही वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आणि रेनकोट विक्रीस ठेवण्यात आले आहेत. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्‍याने रेनकोट व छत्र्यांची मागणी अचानक वाढली आहे. काही दुकानांत साठा कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अनेक दुकानदारांनी गेल्यावर्षीचा शिल्लक राहिलेला मालही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. यंदा माल आधीच मागवून साठवून ठेवला असल्याने सध्या तरी ग्राहकांची मागणी पुरवली जात आहे. दरम्यान, विक्रीचा वेग पाहता साठा लवकरच संपण्याची शक्यता असल्‍याचे मत काही व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.
बाजारात सध्या छत्र्या व रेनकोटचे विविध प्रकार ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. रेनबो छत्री, थ्रीडी आणि रंग बदलणारी छत्री, फोल्डिंग, स्टिक हँडल, विंडप्रूफ, कार्टून प्रिंट्ससह मुलांसाठीच्या छत्र्या, पारदर्शक स्वयंचलित छत्र्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेनकोटमध्ये जॅकेट स्टाइल, पोंचो, बायसायकल रायडर्ससाठी डिझाइन केलेले रेनकोट, फॅशनेबल रेनकोट, मुलांसाठी हलके आणि आकर्षक रंगांचे रेनकोट उपलब्ध आहेत. पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लॅस्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. नामांकित कंपन्यांच्या चपला, शूज याचबरोबर अतिशय स्वस्त दरातील प्लॅस्टिक आणि रबरच्या चपला बाजारात उपलब्ध आहेत. अगदी १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.

वापरा आणि फेका रेनकोट
पावसाळ्यात कायम जवळ रेनकोट बाळगणे अनेकांना आवडत नाही. आता बाजारात वापरा आणि फेका अशा प्रकारचे रेनकोट आले आहेत. एकदा वापर झाल्‍यावर हा रेनकोट फेकला तरी चालताे. या रेनकोटची किंमत ३० रुपयांपासून ते थेट १५० रुपयांपर्यंत आहे. वजनाने हलका व मुलायम प्लॅस्टिक वापरून हे कोट तयार केले आहेत.

लहान मुलांचे आकर्षण
लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टूनचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू, स्पायडरमॅन, तर लहान मुलींसाठी डोरा, बार्बी डॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेले रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. दरवर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ट्रेंड आणले जातात. यंदाही तसा प्रयत्न दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com