आरोग्य केंद्र
आरोग्य केंद्र
भारत जगभरात आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) आदींचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला देशभरातील वेलनेस सेंटर्समध्ये (आरोग्य केंद्र) एकत्रित केले जात आहे.
पर्यटन मंत्रालयाने वेलनेस सेंटर्ससाठी (वेलनेस टुरिझम) काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे, सेवा प्रदात्यांना प्रशिक्षण देणे, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभाग आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात. गेल्या काही वर्षांत देशभरात आरोग्य केंद्रांची संख्या वाढत असल्याने दर्जेदार सेवेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती; त्यावर तोडगा म्हणून रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळाने (एनएबीएच) व आयुष्य मंत्रालयाने वेलनेस सेंटर्सच्या मान्यतासाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत.
पर्यटन मंत्रालयाने यामध्ये मार्केट डेव्हलपमेंट असिस्टंट (एमडीए) योजना मान्यताप्राप्त वेलनेस सेंटर्ससह, वेलनेस टुरिझम सर्व्हिस प्रोव्हाइडर्सनादेखील विस्तारित केली आहे. सध्या राज्य पर्यटन विभागांनी मान्यताप्राप्त वेलनेस सेंटर्सदेखील एमडीएसाठी पात्र ठरविले आहे. ‘एमडीए’ मिळवू इच्छिणाऱ्या सर्व वेलनेस सेंटर्सना ‘एनएबीएच’ची मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करने बंधनकारक करण्यात आले.
एनएबीएच आणि आयुष्य मंत्रालयाकडून वेलनेस सेंटर्सला मान्यता देण्याच्या उपक्रमाला पर्यटन मंत्रालयाने तसेच वेलनेस टुरिझम सर्व्हिस प्रोव्हायडर्स, राज्य सरकारे आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे.
भारतालाच का प्राधान्य?
खालील घटकांमुळे भारत मेडिकल टुरिझमसाठी फायदेशीर आहे
- देशातील रुग्णालयांमधील बहुतेक डॉक्टर आणि सर्जन अमेरिका, युरोप किंवा इतर विकसित राष्ट्रांमधील काही वैद्यकीय संस्थांमध्ये प्रशिक्षित आहेत. अनेक जणांनी त्याठिकाणी अनेक वर्षे काम केले आहे.
- अनेक भारतीय रुग्णालयांमध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय समूहांची उच्च दर्जाची वैद्यकीय आणि निदान उपकरणे उपलब्ध आहेत.
- देशातील परिचारिका जगातील सर्वोत्तम परिचारिका म्हणून ओळखल्या जातात. देशात जवळपास एक हजारांहून अधिक मान्यताप्राप्त परिचारिका-प्रशिक्षण केंद्रे, जी बहुतेक शिक्षण रुग्णालयांशी संलग्न आहेत, दरवर्षी दहा हजारांहून अधिक परिचारिका पदवी धारण करतात.
- भारतातील आरोग्यसेवा या इतर देशांच्या तुलनेत किफायतशीर ठरतात. शिवाय, उच्च दर्जाच्या सेवा पुरवल्या जातात.
‘एनएमडब्ल्यूटीबी’ची स्थापना
पर्यटन मंत्रालयाने २०१५ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आणि कल्याण पर्यटन मंडळाची (एनएमडब्ल्यूटीबी) स्थापना केली. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी (आयुष) या भारतीय औषध प्रणालीसह वैद्यकीय आणि वेलनेस टुरिझमच्या प्रचारासाठी एक समर्पित संस्थात्मक चौकट प्रदान करण्यासाठी ही मंडळाची स्थापना करण्यात आली. संघटित पद्धतीने वेलनेस टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी एक छत्री संघटना म्हणून काम करण्यासाठी ही मंडळाची स्थापना करण्यात आली.
- २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय रुग्णांची संख्या ४.३ लाखांवरून २०१९ मध्ये सात लाखांवर पोहोचली.
वैद्यकीय मूल्य असलेले प्रवास आणि निरोगीपणा पर्यटन (एमव्हीटी) MVT
आरोग्यसेवेसाठी पर्यटन हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगांचे एकत्रित उत्पादन म्हणून मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलचा प्रचार केला जात आहे. जगभरात मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हलचा विकास मोठ्या गतीने होता आहे. थायलंड, मेक्सिको, अमेरिका, सिंगापूर, भारत, ब्राझील, तुर्की आणि तैवान हे वैद्यकीय मूल्याच्या प्रवासासाठी रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत अव्वल देश आहेत. जागतिक वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाच्या बाजारपेठेचा आकार ६०-८० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. जगभरात सुमारे १४ दशलक्ष लोक वैद्यकीय पर्यटनासाठी सीमा ओलांडून प्रवास करतात.
भारताच्या दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये एमव्हीटी सेवा प्रदात्यांची संख्या जास्त आहे
२०१९ साठी अंदाजे ५-६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारपेठ आहे.
जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय) मान्यताप्राप्त रुग्णालयांच्या संख्या
दिल्ली - ९
मुंबई - ६
बंगळूर - ३
चेन्नई - २
हैदराबाद - २
अहमदाबाद - २
कोलकाता - १
नागपूर - १
कोचीन - १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.