

निकम स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी फाउंडेशन कोर्स
माणगाव, ता. ३१ (बातमीदार) ः वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा यांच्या पुढाकाराने रोटरी प्रतिष्ठान खेड व एस. एस. निकम इंग्लिश स्कूल माणगाव यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा म्हणजे जेईई, नीट, सीईटी, एमपीएससी आणि यूपीएससी आदी परीक्षांची तयारी करून घेणारा फाउंडेशन कोर्स एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम यांनी दिली.
हा फाउंडेशन कोर्स १६ जूनपासून सुरू होणार असून होऊन पुढील पाच वर्षे राहणार आहे. हा कोर्स पूर्णतः ऑफलाइन पद्धतीने माणगाव आणि इंदापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणार आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचा समावेश असून हा कोर्से इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असणार आहे. सुतारवाडी येथे या कोर्सबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम यांनी सांगितले, की ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे अशा शहरातील दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर या वेळी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, की एस. एस. निकम स्कूल माणगाव या संस्थेने १९७८ पासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. आपल्या मतदारसंघातील विद्यार्थी केवळ एमपीएससी व यूपीएससी परीक्षाच नव्हे तर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन त्यांनी आपल्या शाळेचे, महाविद्यालयाचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, हीच आमची अपेक्षा असून या उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. हा सामूहिक पुढाकार ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या यशाची शक्यता वाढवणारा आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर विश्लेषणात्मक विचार, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण यांचा विकास या उपक्रमाद्वारे साध्य केला जाणार आहे. हा उपक्रम म्हणजे माणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविणे, तसेच आत्मनिर्भर आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज असे भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक ठोस पाऊल असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक नामी संधी आहे. या संधीचा लाभ माणगाव परिसरातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन नामदार आदिती तटकरे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.