हातचलित यंत्राने भातलावणी सुखकर

हातचलित यंत्राने भातलावणी सुखकर
Published on

वाणगाव, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मागील वर्षी २४ हेक्टरने वाढ होऊन ७६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भातलावणी करण्यात आली होती. यंत्राच्या किमती महागड्या असल्याने सामान्य शेतकऱ्याला यंत्राच्या साह्याने भातलावणी करणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने कमी किमतीत शेतकऱ्यांसाठी हाताने चालविण्याचे भातलावणीचे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये हे हातचलित यंत्र फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे यंत्र खरेदी करावे, असे पालघर उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी आवाहन केले आहे.

खरीप हंगामात भातलावणी करणे सोपे व सोईस्कर होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कोकण कृषी विद्यापीठाने निर्मिती केलेल्या हातचलित भातलावणी यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना भातलावणी खर्चिक आणि कंटाळवाणी वाटणार नाही, असेही बर्वे यांनी सांगितले. वाकून हाताने रोपलावणी करणेही खूप त्रासाचे, वेळ घेणारे आणि खर्चिक असल्याने हातचलित यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. वाकून भातलावणी केल्याने होणारा शारीरिक तास या यंत्राच्या वापराने कमी होतो. यंत्राचा वापर करणे सोपे आणि कमी शारीरिक ताण देणारे असते. तसेच भात उत्पादन वाढण्याची शक्यता असते.

१८ हजार १५० रुपयांत यंत्र
ट्रे पद्धतीने रोपे बनवून लावणी करण्यात येणाऱ्या यंत्राची किंमत ही साधारणतः दोन ते तीन लाख आहे. हे यंत्र खरेदी करणे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्याऐवजी अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडेल, या हेतूने कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने १८ हजार १५० रुपये किमतीचे हातचलित भातलावणी यंत्र नव्याने विकसित केले आहे, असे विश्वास बर्वे यांनी सांगितले.

हातचलित भातलावणी यंत्राचे फायदे :
- पारंपरिक पद्धतीने केलेली रोप वापरता येईल. ट्रेमधील रोपांची आवश्यकता नाही.
- कमी दिवसांची रोपे वापरून जास्त उत्पादन घेता येते.
- लागवड ओळीत झाल्याने किडरोग नियंत्रण आणि आंतर मशागत करणे सोपे जाते.
- भातलावणीची प्रक्रिया जलद आणि सोपी होते, ज्यामुळे वेळेची बचत होते.
- मजुरांच्या खर्चात बचत होते. कारण एका व्यक्तीला कमी वेळेत जास्त क्षेत्रात भातलावणी करता येते.
- भातलावणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाल्यामुळे भात उत्पादन वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com