

गोद नदीपात्रात मातीचा भराव
माणगावकरांना गढूळ पाणीपुरवठा; पुराच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान
माणगाव, ता. ३१ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गाची साडेसाती आता कळमजे ग्रामस्थांच्या मुळावर आली आहे. माणगावजवळील कळमजे येथील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. तेथील गोद नदीपात्रात मातीच्या भरावामुळे परिसरातील पाच गावांतील नागरिकांना मातीमिश्रित गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील शेकडो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
कळमजे पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. येथील गोद नदीपात्रात १० फूट रुंद आणि आठ फूट उंच तसेच २० फूट लांबीचा मातीचा भराव करण्यात आला आहे. मात्र तो भराव पावसाळ्यात नदीपात्रातच ठेवला जातो. त्यामुळे पावसाळ्यात तो भराव वाहून शेतीत जातो. यामुळे दरवर्षी भातशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. उन्हाळ्यात गोद नदीपात्रात कालव्याचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे कळमजे, खरवली फाटा, सालेगाव, मांगवली आणि बामणोली या पाच गावांतील ग्रामस्थांना दूषित आणि गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या पाच गावांची मिळून बामणोली ग्रामपंचायत आहे. याबाबत तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पावसाळ्यात पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून दरवर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. दरम्यान, नुकसानभरपाईची मागणी करूनसुद्धा शासनाने अद्याप भरपाई दिलेली नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कळमजे येथील ग्रामस्थ वसंत वाढवळ यांची १० गुंठे जमीन नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनाने हस्तांतरित केली आहे. त्याचा आर्थिक मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही, असा आरोप केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.