वालधुनी नदीला प्रदूषणाचा फेस!

वालधुनी नदीला प्रदूषणाचा फेस!

Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ३१ : शहराच्या मध्यातून वाहणारी आणि एकेकाळी स्वच्छ जलप्रवाह म्हणून ओळखली जाणारी वालधुनी नदी सध्या भयावह रूपात दिसून येत आहे. उल्हासनगरच्या वडोल गावातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या फेसाचे अस्तित्व दिसून येत आहे. या फेसामागे अंबरनाथ एमआयडीसी आणि उल्हासनगरातील काही रासायनिक कंपन्यांनी नदीत थेट सोडलेले रासायनिक सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वालधुनी नदीचा उगम अंबरनाथजवळील डोंगरांमध्ये होतो. ती उल्हासनगर शहरातील वडोल गाव, कॅम्प क्रमांक ३ मार्गे शहरातून पुढे वाहते. सध्या या संपूर्ण प्रवाहात पांढऱ्या फेसाची चादर पसरलेली दिसून येत आहे. या फेसातून येणारी दुर्गंधी संपूर्ण परिसराला वेढून टाकली आहे. यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आणि पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, अंबरनाथ एमआयडीसीमधील अनेक रासायनिक आणि डाय कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडतात. या कंपन्यांवर वेळोवेळी कारवाईची मागणी होत असूनही, प्रशासनाची भूमिका केवळ कागदावर मर्यादित राहिली आहे. परिणामी, प्रदूषणाचा भयंकर स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
वालधुनी नदीतून सध्या पाणी नाही, तर प्रदूषण वाहत आहे. हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही, तर उल्हासनगरच्या हजारो कुटुंबांच्या आरोग्याचा आहे. प्रशासनाने वेळेवर कठोर निर्णय घेतला नाही, तर ही फेसाळलेली नदी भविष्यात शहरासाठी महामारीचे कारण ठरू शकते, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

नागरिकांमध्ये संताप
नदीच्या प्रवाहात पाण्याच्या जागी आता फेस आणि घाण दिसू लागली आहे. नदीचे स्वरूप इतके बदलून गेले की ती ‘नदी’ आहे की ‘रासायनिक नाला’, असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. उल्हासनगर परिसरातील हजारो नागरिक या नदीच्या सान्निध्यात राहत असल्याने हे प्रदूषण आरोग्यासाठी थेट संकट बनू शकते. त्वचा विकार, श्वसनाचे त्रास, डेंगी-मलेरिया यांसारख्या साथींच्या आजाराचा धोका वाढत आहे.

प्रशासन, प्रदूषण मंडळ कुठे आहे?
महसूल, पर्यावरण आणि नगरविकास विभागांकडून यावर ठोस कारवाईची अपेक्षा असूनही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही या प्रकाराकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

मुख्य समस्या
* दुर्गंधीयुक्त प्रवाहामुळे आरोग्य धोक्यात
* एमआयडीसीतून सरळ सांडपाणी नदीत
* प्रशासन आणि मंडळाची उदासीनता
* रासायनिक पाण्यामुळे भविष्यासाठी गंभीर इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com