

ठाण्यात कृषी परिवर्तनाची नांदी
१५ दिवसांत ९० गावांमध्ये शेती व पशुपालनविषयक जनजागृती
ठाणे, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र ठाणे यांच्या विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाली. २९ मे ते १२ जून या कालावधीत १५ दिवस चालणाऱ्या या अभियानात विविध तालुक्यांतील ९० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत झाले.
अभियानात दररोज सहा गावांना भेटी देण्यात येणार आहेत. मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करणार असून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त माहिती प्रत्यक्ष गावात दिली जाणार आहे. अभियानात शेतकरी व पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त पद्धती आणि संशोधनावर आधारित माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये गोचीड निर्मूलन, लसीकरण, शेळीपालन, मूर घास निर्मिती, संकरीत चारा लागवड, जैविक खते, वासरांचे आहार व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्याची सुधारणा, लम्पी रोगग्रस्त जनावरांची निगा अशा अनेक विषयांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठातर्फे तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी झाले.
अभियानांतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक आदी योजनांची माहिती जनजागृती वाहनांद्वारे पोहोचवली जात आहे. शेतकऱ्यांची गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर थेट मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळीपालन, जनावरांची निगा आणि भात लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती दिली जाईल. या वेळी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख, तसेच संबंधित तज्ज्ञ व अधिकारी उपस्थित होते. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे खरीप हंगामासाठी नवतंत्रज्ञानाचे प्रसारण, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, माती परीक्षणानुसार पीक निवड, संतुलित खतांचा वापर, आधुनिक उपकरणांचा उपयोग, कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक, यंत्र आधारित शेतीचे मॉडेल, तसेच शेतकऱ्यांचे नवोपक्रम आणि संशोधन थेट शेतीत उतरवण्याची प्रक्रिया यात समाविष्ट आहे.
संशोधनाचा फायदा
ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर जिल्ह्यांतही हे अभियान राबविले जात असून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रतिनिधी नेमला आहे. विशेषतः कोकण विभाग, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी विद्यापीठातर्फे समन्वय साधला आहे. या उपक्रमामार्फत विद्यापीठातील संशोधनाचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेती व पशुपालन क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि सक्षम करण्याचा उद्देश आहे. हे अभियान शेतकरी-शास्त्रज्ञ थेट संवादाच्या माध्यमातून नवकल्पना, शाश्वत शेती आणि आधुनिक व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अभियानानंतरही शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.