

‘शून्य कचरा’ संकल्पनेचा बोजवारा
डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो; उल्हासनगरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : ‘शून्य कचरा शहर’ ही घोषणा करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेचे प्रत्यक्ष चित्र अत्यंत विरोधाभासी आहे. खडी मशीन डम्पिंग ग्राउंड क्षमतेपलीकडे भरल्यामुळे आता तिथून कचरा ओसंडून वाहत आहे. दुसरीकडे शहरभर दुर्गंधी, घाण आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त आहेत. लाखो रुपयांची जाहिरात, कोट्यवधींचा कचरा व्यवस्थापन ठेका आणि तरीही गल्लोगल्ली साचलेला कचरा हा विरोधाभास आता लोकांच्या नजरेत येऊ लागला आहे.
उल्हासनगरच्या खडी मशीन परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर सध्या इतका मोठा कचऱ्याचा साठा झाला आहे, की वाहनांना प्रवेशदेखील अवघड होऊ लागला आहे. ठेकेदार कोणार्क एन्व्हायर्नमेंट कंपनीकडून डम्पिंग साइटवर अत्यंत धीम्या गतीने प्रक्रिया केली जात असून, दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ४०० मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे शहरात इतरत्र कचऱ्याचे ढीग उभे राहत आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प ४ आणि ५ हे भाग कचऱ्याचे ‘हॉटस्पॉट’ ठरत असून, रस्त्यांकडेला ढीग पडले आहेत. उग्र वास, डासांचा त्रास आणि अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. घंटागाड्यांचे वेळेवर न येणे, कचरा नियमित न उचलणे आणि विल्हेवाट न लावणे या त्रिसूत्रीने परिस्थिती बिघडली आहे.
कोट्यवधींचा ठेका आणि शून्य परिणाम
महापालिकेने ‘शून्य कचरा’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे. दरम्यान, या ठेक्यातील कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कचरा व्यवस्थापनात अपयश असूनही महापालिका प्रशासन गप्प का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी
या परिस्थितीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत ठेकेदार कंपनी आणि प्रशासन यांच्या चौकशीची मागणी केली आहे. करोडो रुपये खर्चूनही जर शहर घाणीत रुतले असेल तर जबाबदारी निश्चित व्हायलाच हवी, अशी संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.
‘शून्य कचरा’ घोषणा हवेत, जमिनीवर ढीगच ढीग!
शहरभर जाहिरात फलकांवर ‘स्वच्छ उल्हासनगर, सुंदर उल्हासनगर’च्या घोषणा झळकत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फक्त कचऱ्याचे साम्राज्य आहे. हे दृश्य पाहून नागरिक विचारू लागले आहेत, की शहराला स्वच्छतेचा मुखवटा चढवून खरे चित्र लपवले जातेय का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.