बेलापूरची पूनरावृत्ती नेरुळ-जुईनगरमध्ये होणार?
गाळात अडकले होल्डिंग पाँड
नेरूळ-जुईनगरमध्ये पूरस्थितीचा धोका
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : जुईनगर आणि नेरूळमध्ये पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सिडकोने तयार केलेले होल्डिंग पाँडमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ स्वच्छ करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला तीन महिन्यांची मुदत दिली आहे; मात्र महापालिकेकडून निविदा प्रक्रियाच पूर्ण न झालेली नाही. त्यामुळे सोमवारी (ता. २६) झालेल्या पावसामुळे बेलापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, असा प्रश्न नेरूळकरांना पडला आहे.
नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे प्रत्येक नोडमध्ये होल्डिंग पाँड तयार केले आहेत. होल्डिंग पाँडमध्ये स्वयंचलित झडपांद्वारे समुद्रातील पाणी आत घेऊन साठवून ठेवता येते तर पावसाचे पाणी बाहेर समुद्रात पंपाद्वारे फेकले जाते. हे पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव तयार केले आहेत. तलावांकडे दरवर्षी स्वच्छता करणे अनिवार्य आहे; मात्र सिडकोनंतर महापालिकेनेही या तलावांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणांनी वेढले गेले आहे. नेरूळ आणि जुईनगर नोडच्या मध्यभागी असलेल्या होल्डिंग पाँडमध्ये तलावावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून बेकायदा गोदामे, भंगार सामानाची दुकाने, मोबाईल टॉवर आणि क्रिकेटचे मैदान उभारण्यात आले होते.
गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरूळ आणि जुईनगर भागातील नागरी वसाहतींमध्ये जलमय परिस्थिती झाली. अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी घुसले. जनजीवन विस्कळित झाले होते. धारण तलावात पावसाचे पाणी जाण्यास वाट नसल्याने आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साठल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत याचिकाकर्ते मल्हार देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणल्यानंतर महापालिकेने अखेर या तलावावरील अतिक्रमणे हटवली; परंतु मातीचा भराव काढला नाही. देशमुख यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर ७ एप्रिलला येत्या तीन महिन्यांत मातीचा गाळ काढण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेला दिल्या. आता या येत्या जून महिन्याच्या ७ तारखेला दोन महिने उलटणार आहेत; परंतु तरीदेखील महापालिकेने अद्याप होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यास नेरूळ आणि जुईनगरमधील घरे पाण्यात जाण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. सोमवारी (ता. २६)ला बेलापूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे उडालेला हाहाकार संपूर्ण नवी मुंबई शहराने पाहिला आहे. सीबीडी सेक्टर ११मध्ये कधी नव्हे ते रस्त्यांवर पाणी आले. हे पाणी जाण्यास तब्बल दोन दिवसांचा वेळ लागला. बेलापूरच्या होल्डिंग पाँडमधून पाणी जात नसल्याने सीबीडीतील अनेक नागरिकांच्या वाहनांचे आणि दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले. तसेच महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली. तरीसुद्धा महापालिका यातून काही शिकवण घेत नसल्याचे दिसून येत आहे.
चौथ्यांदा निविदा राबवणार
होल्डिंग पाँडमधील गाळ काढताना कांदळवनांना धक्का लागू नये, याकरिता मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार काम केले जाणार आहे. गाळ काढण्यासाठी महापालिकेने या आधी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवली आहे; मात्र निविदेत आलेल्या कंत्राटदारांकडून वाढीव दर दिला जात असल्याने पुन्हा निविदा राबवण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम महापालिकेत सुरू असल्याचे समजते आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडून नेरूळमध्ये पूरपरिस्थिती येऊ नये म्हणजे झाले.
टक्केवारीची लागण
महापालिकेच्या विकासकामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना टक्केवारी देण्याची अलिखित परंपरा आहे. बऱ्याचदा टक्केवारीची मागणी अधिक असल्याने कंत्राटदाराला परवडत नसल्यामुळे निविदेतील रक्कम वाढवली जाते. वाढवलेल्या रकमेतून टक्केवारी अदा केली जाते. नेरुळ-जुईनगर होल्डिंग पाँडच्या कामालाही याच टक्केवारीचे ग्रहण तर लागले नाही ना, अशी शंका महापालिकेतील काही अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
होल्डिंग पाँडमधील गाळ काढल्यास नेरूळ आणि जुईनगर येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे; परंतु महापालिका निविदेचा खेळ खेळत बसलेले आहेत. नुकताच बेलापूर येथे मुसळधार पावसामुळे झालेली पूरमयस्थिती सगळ्यांनी पाहिलीदेखील आहे. तशीच पुनरावृत्ती नेरूळ आणि जुईनगरमध्ये झाल्यानंतर महापालिकेला जाग येईल का?
- मल्हार देशमुख, याचिकाकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.