

पावसामुळे भाजी महागली
श्रद्धा गायकवाड
ठाणे, ता. ३१ : अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही अडचणीत आले आहेत. त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने अनेक भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा कल आता कडधान्यांकडे वळू लागला आहे. मूग, मटकी, उडीद, हुलगा, काबुली चणे यांसारख्या कडधान्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अशा भागांत आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. टोमॅटो, वांगी, कारले, भेंडी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, मिरची यांसारख्या भाज्यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात पुरवठा घटला आणि त्याचे दर गगनाला भिडले. काही भागांत टोमॅटोचे दर ८० रुपये किलो तर भेंडी, कारल्यासारख्या भाज्या १०० रुपये किलोच्या आसपास पोहोचल्या. दरवाढ लक्षात घेता सामान्य नागरिकांनी रोजच्या स्वयंपाकासाठी भाज्यांऐवजी डाळी, उसळ आणि इतर कडधान्यांचा अधिक वापर करायला सुरुवात केली आहे. भाजीपाल्याच्या तुलनेत डाळी, उसळी व कडधान्ये स्वस्त, पौष्टिक व टिकाऊ असल्याने त्याचा पर्याय म्हणून स्वयंपाकात वाढता वापर होत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम किंवा होममेड फूडकडे वाढलेली रुची लक्षात घेता, कडधान्यांचा वापर वाढल्याचे दिसून येते.
गृहिणींच्या मते दररोज भाजी घेणे आता शक्य होत नाही. त्यामुळे मूग-चवळीच्या उसळी, डाळी आणि खिचडी यांचा वापर स्वयंपाकात वाढवला आहे. त्यामुळे बाजारात कडधान्यांची मागणी वाढली असून, त्याचेही भाव काहीसे वाढले आहेत.
कडधान्यांचे भाव (प्रतिकिलो रुपयांत)
हिरवा वाटाणा - १३०
मूग - १५०
मटकी - १५०
हुलगा - ६०
वाटाणा - ८०
उडीद डाळ - १२५
काबुली चणे - १४०
तुरीची डाळ - १८०
मुगाची डाळ - १२०
मागील आठवड्याच्या तुलनेत मूग, मटकीच्या विक्रीत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता येत्या काळात या कडधान्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. कडधान्य हा पर्याय नागरिकांना अधिक किफायतशीर वाटू लागला आहे.
- सुरेश दळवी, कडधान्य विक्रेते
मुलेही आता या पारंपरिक भाज्या आवडीने खातात, पण भाज्यांचे भाव पाहून दोनदा विचार करावा लागतो. दरवर्षी श्रावणात घरात तीन-चार वेगवेगळ्या रानभाज्या करीत होते, पण यंदा त्या स्वयंपाकघरात यायच्या आधीच भाज्या महाग झाल्यात.
- संगीता गायकवाड, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.