मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते लेवे गुजर समाज मंदिराचे लोकार्पण

मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते लेवे गुजर समाज मंदिराचे लोकार्पण
Published on

मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते लेवे गुजर समाजमंदिराचे लोकार्पण
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : लेवे गुजर स्‍नेहवर्धक मंडळ, मुंबईच्या वतीने खारघर सेक्टर पाचमध्ये समाजासाठी उभारण्यात आलेल्या लेवे गुजर भवनचे लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३१) झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, बी. ए. महाजन, जी. एम. पाटील, रोहिदास चौधरी, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपचे ब्रिजेश पटेल यांच्यासह लेवे गुजर समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
लेवे गुजर समाजाचे अनेक नागरिक मुंबईत नोकरी आणि उद्योग-व्यवसाय करीत आहेत. समाजात एकता असावी, हा उद्देश समोर ठेवून समाजकार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी लेवे गुजर स्‍नेहवर्धक मंडळाची स्थापना केली. या मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि गुजर भवन समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाला. या वेळी खडसे यांनी मुंबईत आरोग्यसेवेसाठी येणाऱ्या रुग्णांना निवास करता यावा, यासाठी लेवे गुजर समाजाच्या वतीने उभारलेल्या समाजमंदिराचे कौतुक केले. तसेच समाजमंदिरात समाजासाठी विविध कार्यक्रम घेता येतील. यासाठी या समाजमंदिराचा उपयोग होणार आहे, ही चांगली बाब असल्याचे त्‍यांनी सांगितले. तर या वेळी स्मरणिकेचे प्रकाशन उपक्रमाचे अध्यक्ष बी. ए. महाजन यांनी केले.
.......................
तळोजा वसाहतीमधील मस्जिद हटवण्याची मागणी
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : तळोजा फेज एक वसाहतीमधील निवासी जागेत बेकायदा मस्जिद उभारण्यात आली आहे. या वेळी नमाजपठणच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने बेकायदा पार्क केली जातात. यामुळे स्‍थानिक रहिवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्‍यामुळे हा गैरप्रकार थांबवावा, अशा मागणीचे पत्र मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी यांनी पालिका आणि पोलिस प्रशासनाला दिले आहे. तळोजा वसाहतीच्या वाढत्या विकासामुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. त्‍यातच तळोजा वसाहतीमधील सेक्टर दोनमध्ये आकार रेसिडेन्सी, सेक्टर पाचमधील एस. एम. हाईट्स आणि एचएमडी गार्डन तसेच सेक्टर १० मधील रिअल पॅराडाईज आदी निवासी सोसायटीच्या जागेत अनधिकृत मस्जिद उभारून नमाजपठण केले जात आहे. नमाजाच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असून स्‍थानिक नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच बकऱ्यांची कत्तल करण्यासाठी सिडकोने भूखंड दिले असताना, धर्माच्या नावाखाली उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली जात आहे. त्‍यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
..........
ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
वाशी, ता. ३१ (बातमीदार) ः ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत ऐरोली सेक्टर २० येथे अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेने या बांधकामाबाबत नोटीस पाठविण्यात आली होती; मात्र त्‍याकडे संबंधित इमारतीच्‍या मालकांनी दुर्लक्ष केल्याने अखेर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
येथील विनिता अपार्टमेंटच्या मागे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत सुरू आहे. अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते; परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या धडक मोहिमेसाठी तीन ब्रेकर, दोन हॅमर, एक गॅस कटर, दहा मजूर व एक मुकादम यांचा वापर करण्यात आला. तर या मोहिमेकरिता जी विभाग ऐरोली येथील अतिक्रमण विभाग अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईअंतर्गत बांधकामधारकाकडून ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com