‘स्वच्छ मुंबई’साठी सरसावली पालिकेची ‘पिंक आर्मी’

‘स्वच्छ मुंबई’साठी सरसावली पालिकेची ‘पिंक आर्मी’

Published on

‘स्वच्छ मुंबई’साठी सरसावली पालिकेची ‘पिंक आर्मी’
५ ते २८ मे यादरम्यान १५० टन राडारोडा, १८० टन टाकाऊ साहित्य संकलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मुंबईच्या स्वच्छतेसाठी मुंबईकर नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे सातत्य कायम ठेवत आता मुंबईतील स्वच्छतेसाठी पालिकेची ‘पिंक आर्मी’ सरसावली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या ‘पिंक आर्मी’त सुमारे नऊ हजार ६०० पेक्षा अधिक महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत असून, दुसरे झाडलोट सत्र अंतर्गत मुंबईत विशेष स्वच्छता केली जात आहे. याअंतर्गत ५ मे २०२५ ते २८ मे यादरम्यान १५० टन राडारोडा, १८० टन टाकाऊ साहित्य आणि ३६० टनांपेक्षा अधिक कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
मुंबई महानगरात स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच धर्तीवर, मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ५ मेपासून प्रमुख रस्त्यांवर दुसरे झाडलोट सत्र (सेकंड स्वीपिंग) सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः रेल्वेस्थानक, मुख्य मार्ग, वर्दळीची ठिकाणे, मोठ्या बांधकाम प्रकल्पांलगतच्या परिसरांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.

७० टक्‍क्‍यांवर महिला स्वच्छता कर्मचारी
मुंबई महापालिकेची ‘पिंक आर्मी’ ही या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे एकूण १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांपैकी नऊ हजार ६०० महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. या पिंक आर्मीने ५ ते २८ मे या कालावधीत १५० टन राडारोडा, १८० टन टाकाऊ साहित्य आणि ३६० टनांपेक्षा अधिक कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे. त्‍यामुळे मुंबईतील रस्ते अधिक स्वच्छ होत असून, वायू प्रदूषण कमी होण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासदेखील मदत होत असल्याचे पालिका प्रशसनाने म्हटले आहे.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com