अंबरनाथमध्ये हुतात्मा चौकात पोलिसांचा मॉकड्रिल!

अंबरनाथमध्ये हुतात्मा चौकात पोलिसांचा मॉकड्रिल!
Published on

अंबरनाथमध्ये हुतात्मा चौकात पोलिसांचा मॉक ड्रिल
चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून रंगीत तालीम
अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर)ः अंबरनाथमध्ये आगामी सण आणि उत्सवांच्या निमित्ताने पोलिसांचा मॉक ड्रिल पार पडला. या वेळी अंबरनाथ, शिवाजीनगर आणि हिललाइन पोलिस उपस्थित होते. हा मॉक ड्रिल पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. दरम्यान, नागरिकांनाही शहरात शांतता राखण्याचा संदेश दिला.
पावसाळ्यासोबत विविध धार्मिक सण आणि उत्सवांचे दिवसही सुरू झाले आहेत. अशात यदाकदाचित शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिल्यास त्यावर वेळीच नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत पोलिसांनी अंबरनाथमध्ये शनिवारी (ता. ३१) पूर्वच्या हुतात्मा चौकात मॉक ड्रिल केले. या वेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून एकप्रकारची रंगीत तालीम करण्यात आली. सण, उत्सवाच्या काळात अनेकदा जमावाची परिस्थिती उद्भवते. परिणामी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागतो. दरम्यान, कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारची पावले उचलायची आणि नियंत्रण कसे मिळवायचे, याबाबत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी अंबरनाथ पोलिस सहआयुक्त शैलेश काळे, शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील, अंबरनाथ ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, हिललाइन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप तसेच तिन्ही ठाण्यांचे पोलिस कर्मचारी, हवालदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पोलिस कर्मचारी सुरक्षा ढाल, लाठी, बंदुकांसह तैनात होते. या तालमीत सर्वप्रथम जमावावर पाण्याचा मारा केला. दरम्यान, जमाव शांत होत नसल्यामुळे पुढे गॅसचा वापर करतात. त्यानंतर लाठी चार्ज आणि शेवटी प्लॅस्टिक बुलेटची फायरिंग करतात. या दरम्यान जमावातील एक जण जखमी होतो. त्याला तत्काळ स्ट्रेचरवरून दवाखान्यात हलविण्यात येते, अशा पद्धतीची प्रात्यक्षिके पोलिसांनी केली.

हा मॉक ड्रिल अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात घेण्यात आले. या वेळी उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्हीमध्ये आणखी योजना राबवण्यात येतील, अशी माहिती सचिन गोरे यांनी दिली. दरम्यान, परिसरात कोणतीही घटना घडल्यास त्यासंदर्भात त्वरित पोलिसांना माहिती देणे, कोणतीही अफवा पसरल्यास ती पोलिसांच्या निदर्शनास आणून देणे, समाजमाध्यमांवर समाजात तेढ निर्माण करेल, दंगा घडवेल अशी कोणतीही अफवा अथवा पोस्ट फॉरवर्ड करू नये, तसेच सतर्क राहून आपल्या शहरात शांतता कायम राहील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील सचिन गोरेंनी नागरिकांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com