पोयनाड येथे भाजपचा महिला मेळावा उत्‍साहात

पोयनाड येथे भाजपचा महिला मेळावा उत्‍साहात

Published on

पोयनाड येथे भाजपचा महिला मेळावा उत्‍साहात
पोयनाड, ता. १ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या वतीने महिला मेळावा नुकताच उत्‍साहात पार पडला. शनिवारी (ता. ३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त पोयनाडजवळील जय मंगल कार्यालयाच्या सभागृहात या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अकलूज येथील शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाडा आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन, ईशस्तवन, पाहुण्यांचे स्वागत झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयीची चित्रफीत याप्रसंगी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रा पाटील यांनी केले. या कार्यक्रमात तनिषा वर्तक (क्रीडा क्षेत्र), सुप्रिया जेधे (सामाजिक क्षेत्र), तृप्ती म्हात्रे (आरोग्य क्षेत्र) यांचा राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप खासदार धैर्यशील पाटील, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, राजिपचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, चित्रा पाटील, राजिपच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, भावना पाटील, गीता पालरेचा, सतीश धारप, रवी मुंढे, भाजप जिल्हा महिला अध्यक्ष मंजूषा कुद्रमोदी, महेश मोहिते, वेदिका पाटील, मिलिंद पाटील, गिरीश तुळपुळे, नीलेश थोरे हे मान्यवर उपस्थित होते. मजबूत समाजासाठी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या मातृशक्तीच्या प्रेरणेतून हे महिला सक्षमीकरणाचे कार्य पुढे नेले जाईल. भारतीय जनता पक्ष सदैव महिलांच्या न्याय, सुरक्षा व सन्मानासाठी कटिबद्ध राहील, असे खासदार धैर्यशील पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच, आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या महिलांचादेखील सन्मान करण्यात आला. या महिला मेळाव्याची सांगता पसायदानाने करण्यात आली. या मेळाव्याला परिसरातील महिला व भाजपचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
..........
पावसाळ्याची चाहूल लागल्याने ताडपत्री खरेदीची लगबग
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः पावसाळ्याची चाहूल लागल्याने बाजारपेठांमध्ये ताडपत्री खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठांतील दुकानात विविध कंपन्यांच्या ताडपत्री विक्रीस आल्या आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊ नये, यासाठी घरावर ताडपत्री टाकून ते संरक्षित केले जाते. ताडपत्री विक्रेत्यांनी सांगितले, की पावसाळा सुरू झाला, की आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या ताडपत्री विक्रीसाठी आणत असतो. सध्या ८० ते ९० रुपये मीटर या भावाने तयार ताडपत्रीची विक्री होत आहे. आगामी काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसापासून घराचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी तयारी सुरू केली आहे. काही घरांवर पारंपरिक मातीची कौले, टिनपत्रे, यासह प्लॅस्टिक ताडपत्रीचा वापर केला जातो. पावसाचे वेध लागल्याने शहरातील बाजारपेठेत प्लॅस्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दुकानात होत आहे. ग्रामीण भागात आठवडा बाजारांमध्येही प्लॅस्टिक शीट व ताडपत्री विक्रीची दुकाने थाटली गेलेली दिसून येत आहेत. दुकानदारांनी विविध रंगांच्या आकर्षक ताडपत्री विक्रीस आणल्या आहेत. पिवळ्या, काळ्या, निळ्या रंगातील या प्लॅस्टिक ताडपत्रीला प्रती मीटर ८० ते ९० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकरीवर्गाकडून शेतमाल तसेच गोठ्यावर व पाळीव जनावरांच्या वैरणावर झाकण्यासाठी विविध आकारांतील प्लॅस्टिक शीट खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
.....................
सखाराम सहदेव तांदळेकर यांचे निधन
श्रीवर्धन (वार्ताहर) ः धारवली येथील रहिवासी सखाराम सहदेव तांदळेकर यांचे वयाच्या ८०व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेना (उबाठा) श्रीवर्धन मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बाबा नावाने सर्वश्रुत असणारे तांदळेकर यांच्या निधनामुळे धारवली गावावर शोककळा पसरली आहे. अंत्ययात्रेला सामाजिक, राजकीय मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखाराम तांदळेकर यांच्यावर धारवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
.............
कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे सेवानिवृत्त
कर्जत (बातमीदार) ः गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र पोलिस दलात प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ सेवा बजावलेले कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संपूर्ण पोलिस दलात एक भावनिक वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी आज त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती. दरम्यान, राहुरी कृषी विद्यापीठातून एमएससी (ॲग्री) ही पदवी प्राप्त केल्यानंतर, डी. डी. टेळे यांची १९९१ रोजी एमपीएससीतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्यातून सेवा सुरू केली. त्यानंतर गोरेगाव पोलिस ठाणे, मुंबई इमिग्रेशन विभागात त्‍यांनी अत्यंत प्रभावी सेवा दिली. २००६ मध्ये पोलिस निरीक्षक आणि २०१७ मध्ये सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती मिळवत त्यांनी विविध महत्त्वाच्या ठिकाणी नेतृत्व केले. ठाणे आयुक्तालयातील कासारवडवली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना १४ जणांच्या सामूहिक हत्याकांडाचा यशस्वी तपास, हा त्यांच्या कौशल्याचा उत्तम दाखला ठरतो. २०२४ मध्ये त्यांची बदली नवी मुंबईहून रायगड जिल्ह्यातील कर्जत उपविभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळात बदललेली राजकीय स्थिती आणि आव्हानात्मक परिस्थिती असूनही टेळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पडल्या. तसेच, त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कर्जत, नेरळ आणि माथेरान पोलिस ठाणे यांच्यातील ताळमेळ आजही कायम आहे. त्यांच्या कार्यकाळात महिला सुरक्षा, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई, गुन्हेगारी नियंत्रण, तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी वेळेवर ऐकून घेणे व त्या सोडवण्यासाठी तत्परता त्यांच्याकडून नेहमीच दाखवली गेली आहे.
..........
विमल शेळके यांचे निधन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील धामणपाडा गावातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक विमल विठ्ठल शेळके यांचे गुरुवारी (ता. २९) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९३ वर्ष होते. त्यांच्यावर धामणपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वभावाने प्रेमळ असलेल्या विमल शेळके या धामणपाडा गावात मोठी आई या नावाने परिचित होत्या. धामणपाडा गावातील प्रत्येक धार्मिक तसेच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे व समस्त शेळके परिवार आहे. विमल शेळके यांचे उत्तरकार्य मंगळवारी (ता. १०) धामणपाडा येथे राहत्या घरी होणार आहे. त्यांना ग्रामस्थ मंडळ धामणपाडा यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com