उपजिल्हा रुग्णालय समस्येच्या गर्तेत
उपजिल्हा रुग्णालय समस्येच्या गर्तेत
वैद्यकीय अधीक्षक पदासह स्त्रीरोगतज्ज्ञांच्या जागा रिक्त; श्रीवर्धनकर त्रस्त
श्रीवर्धन, ता. १ (बातमीदार) : श्रीवर्धन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते, मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णालयात दरमहा ३५ पेक्षा अधिक प्रसूती होतात, त्यातील अनेक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जातात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णालयात नियमित स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपासणी व उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे अनेक सामान्य रुग्णांवर आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुकर ढवळे या २०२२ रोजी निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांची कंत्राटी नियुक्ती आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात आली असली, तरी त्यांची उपस्थिती सीमित प्रमाणातच असते. डॉ. ढवळे हे सध्या फक्त सोनोग्राफी आणि सिझरियन शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध असतात. गर्भवती महिलांची नियमित तपासणी मात्र रुग्णालयात होत नाही. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील साधारणपणे शंभरहून अधिक गावांतील महिला या रुग्णालयावर अवलंबून आहेत. सरकारी आरोग्यसेवेवर विश्वास ठेवून येणाऱ्या या महिलांना मात्र अपेक्षित सेवा मिळत नाहीत. यामुळे अनेकदा वेळेवर तपासणी न होऊन गंभीर गुंतागुंती उद्भवत आहेत. श्रीवर्धन रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. कौस्तुभ केळस्कर यांच्याशी बोलले असता महिला रुग्णांच्या व इतर रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर उपलब्धतेबाबतचा फलक लावणार असल्याचे सांगितले. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदही सध्या रिक्त आहे. तात्पुरत्या व्यवस्थापनाची जबाबदारीही येथील डॉ. पावशेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. असे असतानादेखील येथील डॉक्टर्स व कर्मचारी रुग्णाला सेवा देण्याचे काम करत असल्याचे केळस्कर यांनी सांगितले.
...................
कोट
एकीकडे सरकारी योजनेद्वारे महिलांच्या सुरक्षित मातृत्वाची ग्वाही दिली जाते, तर दुसरीकडे रुग्णालयात नियमित स्त्रीरोगतज्ज्ञ व सुविधा नाहीत. स्वतः महिला व बालकल्याण मंत्री या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाच्या पदभरतीकडे तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
- एजाज हवालदार, सामाजिक कार्यकर्ते
....................
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक या रिक्त पदाबाबत शासनाकडे अहवाल पाठवला आहे. यावर पाठपुरावा करण्यात येईल.
- डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.