

झाडीत जळणाऱ्या राखेत लपलेले अघोरी गूढ
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर शहरात नोव्हेंबर २०२४ मध्ये उघडकीस आलेली एक थरारक आणि मन हेलावून टाकणारी घटना चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण शहर मतदानाच्या गडबडीत व्यस्त होते, तेव्हा एका सख्ख्या मामाने केलेला अमानुष कट उघडकीस आला आणि संपूर्ण शहर हादरून गेले. तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा मृत्यू, तिचा घरातच लपवलेला मृतदेह आणि तो गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह झाडीत नेऊन जाळण्याचा अघोरी प्रयत्न. हे सगळे इतक्या थंड डोक्याने आणि योजनाबद्ध पद्धतीने घडले की पोलिसांनाही सुरुवातीला सत्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. मात्र पोलिसांच्या चौकस, तांत्रिक तपासाच्या साह्याने आणि बारकाईने केलेल्या निरीक्षणात मामा जितू नुपे याच्या नकली दु:खाच्या आड लपलेलं क्रौर्य उघडकीस आले. यात फक्त एका चिमुकलीचे नाही, तर माणुसकीचेही मरण झाले.
-------
उल्हासनगर विधानसभा निवडणुकीच्या गोंधळात शहरभर लक्ष वेधले गेले असतानाच कॅम्प ५ मधील हिललाइन पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या एका झाडीत मृतदेहाच्या राखेत लपलेले भीषण गूढ उघडकीस आले. या गुन्ह्याच्या घटनेची सुरुवात झाली ती एक तीन वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याच्या तक्रारीने. हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संग्राम मालकर आणि त्यांच्या अजय गायकवाड, चंदू शिंदे, संदीप बर्वे, जयेश गुरव, द्वारकानाथ कराळे, गणेश सातपुते, सुभाष घाडगे, भटू महाले, सलीम इनामदार, शरद बुरकुल या तपास पथकाने चिमुकलीच्या घरच्यांकडून सखोल माहिती घेतली. स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीला तत्काळ अटकेची मागणी केली. तर दुसरीकडे घरात असलेल्या जितू नुपे या सख्ख्या मामाने भावनांनी भरलेले नाटक सुरू केले. तो तिच्या शोधासाठी रात्रंदिवस रस्त्यावर फिरत होता, मित्रांसोबत झाडीत शोधत होता आणि पोलिसांना मदत करीत असल्याचा देखावा करीत होता.
पोलिसांचे शहाणपण आणि गुन्हेगारी क्षेत्रातील अनुभव त्याच्या नकली सहवेदनेपलीकडे पाहात होते. एका क्षणी जितूने आपल्या एका रिक्षाचालक मित्राला हिललाइन पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या झाडीत पाठवले आणि थेट त्या जागेवर नेले. जिथे काही क्षणापूर्वी चिमुकलीचा मृतदेह जाळण्यात आला होता. हीच ‘योगायोगाची वेळ’ पोलिसांना संशयास्पद वाटली.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी दाखल होत तपासाची सूत्रे स्वतः हाती घेतली. यासाठी आठ विशेष पथके तयार केली. पोलिस ठाण्याच्या मागील टेकडी परिसरातील झाडीतून उरलेली राख, प्लॅस्टिकच्या वासाचे निरीक्षण, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि कॉल रेकॉर्ड तपासातून जितूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली गेली.
शेवटी पोलिस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीत जितूला अडकवले आणि थेट पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चिमुकलीसोबत मस्करी करताना फटका बसून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तब्बल तीन दिवस तिचा मृतदेह घरातच एका कोपऱ्यात झाकून ठेवला होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे असताना मामाने पोलिस ठाण्यामागील झाडीत चिमुकलीचा मृतदेह नेऊन जाळल्याचे कबूल केले.
जबाबदारी, जागरूकतेचा संदेश
या प्रकरणात हत्येचा उद्देश नसला तरी पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा केल्यामुळे जितूला अटक करण्यात आली. पोलिस तपास आणि जनतेचा रोष या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही घटना समाजाला जबाबदारी आणि जागरूकतेचा संदेश देणारी ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.