पालिका क्षेत्रात ७५ हजार वृक्षांची लागवड

पालिका क्षेत्रात ७५ हजार वृक्षांची लागवड
Published on

विरार, ता. १ (बातमीदार) : वाढते अतिक्रमण, विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरितपट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी ७५ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. यात देशी प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत. यासाठी सहा कोटींचे नियोजन केले आहे. या वृक्षांच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची नियुक्त केली जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

वसई-विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. यामुळे काही ठिकाणी वृक्षतोडही केली जाऊ लागली आहे. शहरातील वनीकरणाचा पट्टा वाढावा व पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी पालिकेकडून वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत, परंतु शहरात असलेल्या वृक्षांची माहिती पालिकेला मिळावी, यासाठी वृक्षगणनाही होणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील वृक्षांची आकडेवारी व माहिती समोर येते. यापूर्वी पालिकेने २०१६ मध्ये वृक्षगणना केली होती. त्या वेळी पालिकेच्या कार्यक्षेत्रात १४ लाख ४२५ वृक्षांची नोंद करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पुन्हा वृक्षगणनाच झाली नसल्याचे समोर आले आहे.

वृक्षगणना करण्यासाठी पालिकेने २०२४ मध्ये निविदा ही काढली होती. या निविदेत दोन ते तीन ठेकेदार पुढे आले होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ही त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे नऊ वर्षे झाली, तरीही अजूनही शहरातील वृक्षगणना होऊ शकली नाही. त्यामुळे शहरात एकूण किती वृक्ष आहेत व किती वृक्षांची कत्तल झाली, याची माहिती पुढे येऊ शकली नाही.

देशी प्रजातीची झाडे पालिका हद्दीत लावण्यात येणार आहेत. दरवर्षी पालिका क्षेत्रात एक लाख ते ५० हजार झाडे लावण्यात येतात. या वेळी साधारणपणे चार फुटांपर्यंत वाढलेली झाडे लावण्यास सांगितले. वृक्ष लावण्याने शहरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्याबरोबरच नैसर्गिक सुंदरता आणि हरित वसई-विरार होण्यास मदत होणार आहे. यावर्षी ७५ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. ही झाडे स्मशानभूमी, तलाव, रस्त्याच्या दुतर्फा, तसेच इतर ठिकाणीही लावण्यात येणार आहेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com