पनवेल महापालिकेतील प्रभाग रचना जैसे थे
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १ ः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दोन टप्प्यात निवडणुका होतील, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच २० प्रभागांत ७८ नगरसेवकांची संख्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक-दोन वर्षांपासून आपल्या प्रभागाची बांधणी करणाऱ्या इच्छुकांना दिलासा मिळणार आहे.
२०१६ ला पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पनवेल नगर परिषदेचा पूर्वीचा भाग, सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला. ११० किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या महापालिकेची पहिली निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्या वेळी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होती. समाविष्ट गाव आणि खारघर असे १ ते ६ अशी प्रभागांची संख्या आहे. कळंबोली वसाहती ७, ८, ९ आणि १० असे प्रभाग आहेत. क्रमांक ९ मध्ये आसूड गाव, वळवली, टेंभुर्डे, खिडुकपाडा या गावांचा समावेश आहे. ११ ते १३ क्रमांकाच्या प्रभागात विशेषकरून कामोठेचा भाग येतो. त्याचबरोबर १४ मध्ये खांदा गाव तसेच पनवेलच्या काही परिसराचा समावेश करण्यात आला आहे. १५ मध्ये संपूर्ण खांदा वसाहत असून, १६, १७ प्रभागात नवीन पनवेल समाविष्ट आहे. तसेच १८ आणि १९ या प्रभागात संपूर्ण पनवेल शहर सामावून घेण्यात आलेले आहे. प्रभाग २० मध्ये तक्का, पोदी आणि काळुंद्रे गाव येते. अशा प्रकारे पूर्वीची प्रभाग रचना असून, मध्यंतरी महाविकास आघाडीने एक सदस्य रचना केली होती. त्याचबरोबर सदस्य संख्याही वाढवली होती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेत आल्यानंतर हा निर्णय रद्द करून पुन्हा बहुसंख्य सदस्य रचना करण्याचे ठरले. मध्यंतरी ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी यासंदर्भात निकाल देत चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यभर हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच प्रभाग कायम राहतील, अशी दाट शक्यता आहे.
आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका
सव्वा सहाशेहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे. याकरिता एक लाखाहून जास्त व्हीव्हीएम मशीन गरजेच्या आहेत. इतक्या मशिन्स उपलब्ध नसल्याने दोन टप्प्यात निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आधी जिल्हा परिषदेच्या त्यानंतर महापालिका, नगर परिषदांची रणधुमाळी उडणार आहे.
२०१७ नुसार पनवेलची रचना
निवडून येणारे नगरसेवक -७८ + ५ स्वीकृत
प्रभाग-२०
चार नगरसेवक असलेले प्रभाग-१८
तीन नगरसेवक असलेले प्रभाग-२
कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे निर्माण झालेला तिढा या कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसून प्रशासक कामकाज करतात. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्या विहित मुदतीत होणे गरजेचे आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याप्रमाणेच प्रभाग रचना होतील, अशी एकंदर स्थिती आहे.
- अमोल बोडके, राजकीय अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.