पोशीर, शिलार धरणांमुळे पुरापासून सुटका
पोशीर, शिलार धरणांमुळे पुरापासून सुटका
बदलापूर, अंबरनाथ शहराची तहानदेखील भागणार!
बदलापूर, ता. १ (बातमीदार) : दरवर्षीच्या पूरस्थितीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे. उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण होण्याचे कारण ठरणाऱ्या उल्हास नदीच्या पोशीर आणि शिलार या उपनद्यांच्या परिसरात धरण बांधले जाणार असून, या जिल्ह्यात पडणाऱ्या सर्वाधिक पावसाचे पाणी या धरणांमुळे अडवले जाणार आहे. यामुळे बदलापूरवासीयांची दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या फटक्यातून सुटका होणार आहे.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यात विभागलेले उल्हास खोरे हे कोकण विभागातील महत्त्वाचे खोरे आहे; मात्र या खोऱ्यात पडणारा पाऊस या भागात पूरस्थिती निर्माण करतो. या खोऱ्यात पुरेशी धरणे बांधली नसल्याने या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता अधिकचा फायदा होत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढून उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण होते. उल्हास खोऱ्यात सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. यात कमी अधिक प्रमाण झाले तरी, पावसाची सरासरी साडेचार हजार ते सहा हजार मिलिमीटर इतकी असते, अशी माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.
उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये पोशीर आणि शिलार या उपनद्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर या तालुक्यांतील शहरे आणि गावांना मोठा फटका बसला. यात बदलापूर हे सर्वाधिक लोकवस्तीच्या शहरालाही पुराचा दरवर्षी फटका बसतो. विशेष म्हणजे अनेकदा अंबरनाथ तालुक्यात किंवा बदलापूर शहर आणि आसपासच्या भागात पाऊस नसतानादेखील बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होते.
२६ मे रोजीदेखील अशीच काहीशी स्थिती बदलापुरात निर्माण झाली. बदलापुरात सरासरी १५० मिलिमीटर पाऊस पडला; मात्र त्याचवेळी उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या पोशीर आणि शिलार नद्यांच्या क्षेत्रात असलेल्या नेरळजवळच्या कळंब, कुरूंग, किकवी आणि आसपासच्या परिसरात सरासरी ३०० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली आणि पूरस्थितीचा धोका निर्माण झाला होता.
याच पोशीर आणि शिलार नद्यांवर आता राज्य सरकराने अनुक्रमे पोशीर आणि शिलार ही धरणे प्रस्तावित केली आहेत. पोशीर धरणाची क्षमता १२.३४ टीएमसी, तर शिलार धरणाची क्षमता ६.६१ टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे किमान इतक्या क्षमतेचे पावसाचे पाणी उल्हास नदीत थेट येण्यापासून रोखण्यात यश येईल. त्यामुळे या धरणांची उभारणी झाल्यास उल्हास नदीकिनारी पूरस्थितीचा सामना करणाऱ्या शहरे आणि गावांना ५० टक्क्यांहून अधिक दिलासा मिळेल.
बदलापूर, अंबरनाथ शहराची तहान भागणार
प्रस्तावित पोशीर आणि शिलार धरणाच्या बांधकामासाठी प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली आहे. यातील पोशीर प्रकल्पासाठी सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव कोटी तेरा लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळात सादर केले आहे.
अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करत होतो. यापुढे धरणांची उभारणी फक्त पाण्यासाठी नाही, तर पुरापासून वाचण्यासाठीही करावी लागणार आहे. पूरस्थितीपासून वाचण्यासाठी शिलार आणि पोशीरचा थेट फायदा होणार आहे. नद्यांचा गाळ काढल्यास त्याचा आणखी उपयोग होईल. नद्यांना भिंती बांधल्यास थेट पाणी शहरात शिरणार नाही. त्याचीही मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा पाठपुरावा आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचा मोठा आनंद आहे.
- राम पातकर, माजी नगराध्यक्ष, कुळगाव बदलापूर नगरपालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.