कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्वानांचा उपद्रव
कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्वानांचा उपद्रव
वर्षभरात १४ हजार नागरिकांना चावा
मागील तीन वर्षांत ५१ हजार नागरिकांचे तोडले लचके
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः भटक्या श्वानांचा कल्याण-डोंबिवलीमध्ये उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले त्यांच्या हल्ल्याची शिकार ठरत आहेत. टिटवाळा येथील फिरस्ता वृद्धेला फरपटत नेत श्वानांनी गंभीर जखमी केले होते. यानंतर आता एका चार वर्षांच्या चिमुरडीवर श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडली. गेल्या वर्षभरात केडीएमसी हद्दीत १४ हजार २४८ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे, तर मागील तीन वर्षांत तब्बल ५१ हजार नागरिकांचे लचके श्वानांनी तोडले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
८० हजारांहून अधिक भटके श्वान, धोका वाढतोय
सध्या कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक भटके श्वान आहेत. या श्वानांकडून पिसाळल्याच्या आणि चावण्याच्या तक्रारी सतत पालिकेकडे येत आहेत. नागरिक रात्रीच्या वेळी पायी चालताना, दुचाकी किंवा रिक्षातून प्रवास करताना भटक्या श्वानांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये रात्रीचे फिरणे धोकादायक बनले आहे.
श्वानदंशावरील मोफत उपचार केंद्रे कार्यरत
श्वानदंश झाल्यास महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय तसेच विविध आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी मोफत लसीकरण आणि उपचाराची सोय करण्यात आली आहे. सन २०२२-२३ मध्ये १६ हजार ४१४ नागरिकांना, २०२३-२४ मध्ये २० हजार ३९० नागरिकांना श्वानदंश झाला होता.
निर्बिजीकरणाच्या मोहीम आणि आकडेवारी
महापालिकेने भटक्या श्वानांवर निर्बिजीकरणाची मोहीम राबवली असून, २०२३-२४ मध्ये १४ हजार ४१० श्वानांवर निर्बिजीकरण झाले तर ४२० श्वानांना रेबीज झाल्याचे निदर्शनास आले आणि २०२४-२५ मध्ये १५ हजार ४४५ श्वानांवर निर्बिजीकरण करण्यात आले, तर ३९६ श्वानांना रेबीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील केंद्रात निर्बिजीकरण व उपचार सेवा दिल्या जातात. तसेच डोंबिवली एमआयडीसी भागातही एक नवीन केंद्र सुरु करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
पालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, श्वानदंश झाल्यास तातडीने जवळच्या पालिका रुग्णालय किंवा आरोग्य केंद्रात जाऊन मोफत उपचार घ्यावेत. रेबीज एक जीवघेणा आजार असून, वेळेत लस घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही आरोग्य निरीक्षक कमलेश सोनवणे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.