

वृक्ष छाटणीची नागरिकांची मागणी
जुईनगर, ता. १ (बातमीदार) : पावसाळापूर्व जुईनगरमधील धोकादायक झालेल्या झाडांसह फांद्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पाऊस राज्यभर थैमान घालत असताना नवी मुंबईतदेखील वेळीआधी बरसल्याने पालिका प्रशासनाची धावपळ पाहायला मिळाली. नवी मुंबईत विविध ठिकाणांसह जुईनगर परिसरातील मॉन्सूनपूर्व अनेक कामे मार्गी न लागल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नालेसफाई कशीबशी उरकली असली तरी काही भागात वृक्ष छाटणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जुईनगर सेक्टर-२३ मधील रेल्वे कॉलनी आणि सेक्टर २५ मधील कृष्णा टॉवरसमोरील स्वामी समर्थ मठाकडे जाण्याच्या मार्गासह जुईपाडा गाव परिसरातील वृक्षांची छाटणीच न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शालेय विद्यार्थी, स्वामिभक्त आणि क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी हा रस्ता फारच महत्त्वाचा आहे. जुईनगर परिसरातील अधिकाधिक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करतात. अधिक वाहनांची वर्दळ नसल्याने दुचाकी आणि सायकल शिकण्यासाठी स्थानिकांकडून रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे रेल्वे कॉलनीमधील मोठमोठे वृक्ष तसेच भारत सोसायटीकडील बदामाची झाडे याच्या फांद्या पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे ही पार्किंग समस्येअभावी परिसरातील अनेक वाहनेही रस्त्यावर पार्क केलेली असतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या परिसरातील वृक्षांची छाटणी करून फांद्या पदपथावरून त्वरित उचलाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
.................
अनावश्यक विकासकामांना कात्री लावण्याची मागणी
तुर्भे (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका हद्दीत विविध विकासकामे केली जात आहेत, मात्र अनावश्यक आणि करदात्या नागरिकांचे हित नसणारी विकासकामे शक्यतो टाळावीत, अशा कामांना कात्री लावावी, अशी मागणी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील घोलप यांना एका निवेदनाद्वारे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. जी नागरी कामे सामान्य नागरिकांच्या हिताची नाहीत, त्यांना कात्री लावण्यात यावी. त्यात प्रामुख्याने सुस्थितीत आणि दीर्घकाळ टिकणारे सार्वजनिक फूटपाथ तोडू नयेत वा त्यांची पुनर्बांधणी करू नये, आधीच उत्तम स्थितीत असलेल्या वाहतूक चौकांचे सुशोभीकरण करू नये, अव्यवहारी सायकलिंग ट्रॅकचे बांधकाम करू नये, अंतर्गत चांगल्या स्थितीत असलेले रस्ते उखडण्यात येऊ नयेत अथवा ते पुन्हा बांधू नयेत, जे प्रकल्प सार्वजनिक हिताचे नाहीत, अशांना कात्री लावावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. शहरातील काही नागरी कामांचे स्वरूप किरकोळ असले तरी त्यांचे आकडे सर्वाधिक खर्चिक असतात. यामुळे सार्वजनिक निधीचा योग्य वापर, पारदर्शकता आणि प्रकल्प नियोजन आदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वर्षभरातील अवाढव्य खर्चानंतरही पावसाळ्यात पाणी साचणे, झाडे पडणे, पिण्याच्या पाण्याची समस्या, आरोग्य समस्या, सर्वत्र घाणीचे स्वरूप आदी महत्त्वाच्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे अशी अव्यवहार खर्चिक नागरी कामे करू नयेत, अशी मागणी जागरूक नागरिक स्वप्नील घोलप यांनी आयुक्तांकडे केली आहे.
.........
महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका सेवेतून मेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या ३१ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंदाला शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. यापुढे झपाट्याने काळ बदलत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यालयीन कामकाजात वापर करून नागरिकांची कामे अधिक सुलभपणे होण्याकडे व त्यासाठी ऑनलाइन सेवासुविधा पूर्तीकडे विशेष लक्ष देण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी सज्ज असायला हवे, असे मत मांडले, तर सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबीयांना वेळ द्या. एकटे राहू नका. चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहा, असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी उपआयुक्त शरद पवार व डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनीही शब्दसुमनांतून शुभेच्छा दिल्या. मे २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणारे अतिरिक्त शहर अभियंता संजय खताळ, कार्यकारी अभियंता मनोहर सोनवणे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जया श्रीनिवासन, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा राठोड, लेखा अधिकारी शरद पाटील व रमाकांत पाटील अशा ३१ अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदासह सेवानिवृत्तांचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.