मे महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद!
मे महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद!
बदलापुरात ४९६ मिमी तर माथेरान परिसरात ५०० मिमी पार!
बदलापूर, ता. १ (बातमीदार) ः यंदा मे महिन्यात सुरुवातीला कोसळलेला पश्चिम विक्षोभ आणि त्यानंतर आलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे १६ वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सरकारी हवामान खाते नसले तरी या विभागात अभ्यास करणाऱ्या, खासगी हवामान अभ्यासकांनी केलेल्या नोंदीनुसार गेल्या अनेक दशकांनंतर मे महिन्यात अशा पावसाची नोंद झाली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वाधिक ४९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मे महिन्यात १६ वर्षांपूर्वी अशाच पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्या वेळी सरासरी पावसाची नोंद झाली, मात्र यंदाच्या मे महिन्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. एरव्ही मे महिन्यात जाणवणारा प्रचंड उकाडा पावसाने घालवला, तर काही ठिकाणी या पावसाने पूरस्थितीदेखील निर्माण झाली. यामुळे नालेसफाईपासून विविध कामांची पोलखोल केली. वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला. उन्हाळी पिकांना याचा मोठा फटका बसला, तर आंबा शेवटच्या टप्प्यात हाती आलाच नाही, मात्र हा पूर्वमोसमी पाऊस वळवाच्या पावसापेक्षा अधिकचा होता, अशी माहिती हवामान खात्याचा अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.
यंदाच्या पश्चिमी विक्षोभाचा मोठा फटका महाराष्ट्र आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याला बसला, तर तितकाच फटका जिल्ह्यालाही बसला. संपूर्ण मे महिन्यात चांगलाच पाऊस कोसळला. त्यामुळे कधी नव्हे ते विक्रमी पावसाची नोंद मे महिन्यात झाली. बदलापूर शहरात नेहमीप्रमाणे मे महिन्यातदेखील सर्वाधिक पाऊस पडला. बदलापूर या एकट्या शहरात संपूर्ण मे महिन्यात ४९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बदलापूरनंतर मुरबाड तालुक्यातील धसई ३००, उल्हासनगर ३१२, अंबरनाथ २८९, मुरबाड २७१, कल्याण २६८, ठाणे २५५, कोपरखैरणे २५३, टिटवाळा २४६, ऐरोली २४०, डोंबिवली २३४, भिवंडी २२२, दिवा २१४ आणि शहापूर येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.
मोजक्या ठिकाणीच सर्वाधिक पाऊस
सुरुवातीला पश्चिम विक्षोभ आणि त्यानंतर पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी यात सातत्य दिसले नाही. एखाद्या शहरात दिवसाला २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी शेजारच्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील शहरात अवघा ५० मिलिमीटर पाऊस पडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे बदलापूरसारख्या शहरात ४९६ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी शेजारच्या अंबरनाथमध्ये अवघा २८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
रायगडमध्येही पावसाचा चांगलाच जोर
ठाणे जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीला रायगड जिल्ह्यातील पावसामुळे पूर येतो. रायगडमधील सर्वाधिक पाऊस मुरूडमध्ये झाला. येथे तब्बल ८२४ मिलिमीटर पाऊस पडला. नेरळजवळील कळंब येथे ५८९ मिलिमीटर पाऊस पडला, तर माथेरान येथे ५५१, कर्जत येथे ३७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.