थोडक्यात नवी मुंबई
वाशीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा
तुर्भे (बातमीदार) ः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकमधील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर देशभर भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने भारत जिंदाबाद यात्राचे आयोजन वाशीमध्ये करण्यात आले होते.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी ता. २ रोजी भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या घोषणांच्या गजरात निघाली. या यात्रेचे आयोजन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यात्रेमध्ये विविध सामाजिक स्तरातील नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस एल. आर. गायकवाड, कार्याध्यक्ष विजय कांबळे, धरमसी पटेल, उपाध्यक्ष टिळक जाधव, प्रवक्ते सचिन कटारे, महाप्रदेश उपाध्यक्ष शशिकला जाधव, जिल्हाध्यक्षा शिला बोदडे, लक्ष्मण गोडसे, प्रकाश तुळसे, सिद्धार्थ ठोकळे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारतीय लष्कराच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले आणि देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या जवानांना सलाम केला. कार्यक्रमादरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान आणि पाकिस्तानचा निषेध अशा घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने निनादला. रिपब्लिकन पक्षाच्या या उपक्रमातून राष्ट्रभक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच लष्कराला मनोबल मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
..........
एनएमएमटी बसचालकाला प्रवाशांचा भावनिक निरोप
वाशी, ता. २ (बातमीदार) ः विभागाअंतर्गत बदली झालेल्या एनएमएमटी बसचालकाला प्रवाशांकडून भावनिक निरोप घेण्यात आला. अशा प्रकारे पहिल्यांदाच एका चालकाचा प्रवाशांकडून असा निरोप समारंभ झाल्याने एनएमएमटी विभागात संबंधित कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.
एनएमएमटीच्या बस क्रमांक १०८ चे चालक वाल्मिकी नागरे यांची बदली परिवहन विभागाच्या नियंत्रण शाखेत झाली आहे. तत्पूर्वी नवी मुंबई ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नागरे यांचा सत्काराने भावनिक निरोप घेतला. नागरे हे एनएमएमटीच्या परिवहन सेवेत दीर्घकाळ प्रवाशांची सेवा बजावत असून, त्यांच्या नम्र, सौजन्यशील, मदतीस तत्पर आणि प्रवाशांप्रती समंजस वागणुकीसाठी ते ओळखले जातात. एनएमएमटीमध्ये अनेक वर्षे काम केलेले नागरे यांची नियंत्रण विभागात बदली झाली असून, ते फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांनी सांगितले की, प्रवाशांनी दिलेल्या प्रेमाबद्दल शब्द नाहीत, या घटनेने आपण खूप आनंदित आणि भारावलेलो आहे. आम्ही सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.
............
नेरूळच्या तानाजी मालुसरे क्रीडांगणातील जलवाहिनीची गळती
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः नेरूळच्या तानाजी मालुसरे क्रीडांगणातील जलवाहिनीची गळती झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. क्रीडागंणात सर्वत्र पाणी तसेच चिखल झाल्याने खेळांडूसह ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनदेखील पालिका दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरूळ सेक्टर-६ परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रीडांगण व राजमाता जिजाऊ उद्यान आहे. महापालिका क्रीडांगण व लगतच्या नेरूळ सीव्ह्यू या सिडकोच्या सोसायटीमध्ये संरक्षक भिंत आहे. या भिंतीलगतच महापालिकेची जलवाहिनी गेल्या काही दिवसांपासून फुटलेली आहे. सकाळी व सायंकाळी ज्या वेळी पाणी येते, त्या वेळी या फुटलेल्या जलवाहिनीतून शेकडो लिटर पाण्याची गळती क्रीडांगणात होते. त्यामुळे क्रीडांगणात पाणी साचून राहत आहे. पाण्यामुळे क्रीडांगणात चिखल होत असल्याने मुलांसह खेळांडूना खेळण्यात अडचण येत आहे. शिवाय हे पाणी जॉगिंग ट्रॅकवरून वाहत असल्याने चालण्यासाठी येणाऱ्या काही स्थानिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय त्यांना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. दररोज शेकडो लीटर होत असलेली पाण्याची नासाडी, क्रीडांगणामध्ये साचणारे पाणी, जॉगिंग ट्रॅकवर चालताना पाय घसरून होणाऱ्या दुखापती पाहता पालिका प्रशासनाने या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी समाज सेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
.................
झोपळ्याची दुरवस्था
या उद्यानात खेळण्याचा झोपाळा गेल्या काही महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र महापालिका प्रशासनाकडून या झोपाळ्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. मुलांच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या, तरीदेखील झोपाळ्याची डागडुजी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे पालकवर्गामध्ये नाराजी सूर उमटत आहे.
.........
जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त पारसिक हिल येथे स्वच्छता मोहीम
नेरूळ (बातमीदार) ः जागतिक पर्यावरणदिन २०२५ हा ‘जागतिक स्तरावर प्लॅस्टिक प्रदूषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेंतर्गत साजरा करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका पर्यावरण सप्ताह साजरा करत असून, विविध पर्यावरण विषयक उपक्रम राबवित आहे.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रविवारी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ अंतर्गत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या प्रत्यक्ष सहभागातून ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. यामध्ये बेलापूरचे स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक विजय नाईक तसेच लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समीत आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे नेरूळच्या एसआयएस महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटमधील विद्यार्थी – विद्यार्थिनींही या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. पारसिक रस्ता आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, रॅपर्स, कागदाचे तुकडे आदी मोहिमेत एकत्रित करण्यात आले. या विशेष स्वच्छता मोहिमेत २६ गोणी कचरा गोळा करण्यात आला. यापुढील काळात जागतिक पर्यावरण सप्ताहामध्ये अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहिमा तसेच वृक्षारोपण व इतर पर्यावरण विषयक उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
................
पनवेल महापालिकेत लोकशाहीदिन उत्साहात
पनवेल (बातमीदार) ः सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये २ जून रोजी आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘लोकशाहीदिनाचे’ आयोजन करण्यात आले. या बैठकित नागरी सेवा सुविधा, बांधकाम विभाग अशा विविध विभागाचे पाच अर्ज दाखल झाले होते, या वेळी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या. या कार्यक्रमास परिवहन विभाग व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादवाढीसाठी महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवस आधी द्यावेत, संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनादिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन या वेळी पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.