कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

गरीब मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी संगीत कार्यक्रम
कल्याण (वार्ताहर) : गरीब मुलांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या स्पंदन संस्थेच्या निधी उभारणीसाठी सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन यांच्या गाण्यांवर आधारित अल्टिमेट मेलोडिज ऑफ मदन मोहन हा कार्यक्रम २० जून रोजी रात्री पावणेनऊ वाजता कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केला आहे. मागील १६ वर्षांपासून स्पंदन संस्थेमार्फत गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मदत केली जाते. संस्थेने आजवर जवळजवळ ३५० मुलांना मदत केली आहे. तसेच आदिवासी पाड्यावरील काही शाळांना वस्तू स्वरूपातही मदत केली आहे. याच उपक्रमातील भाग म्हणून निधी उभारणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन हे देणगीदार तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे, असे संस्थेचे एक सदस्य प्रशांत दांडेकर यांनी सांगितले. संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमास जसा प्रतिसाद कल्याणकरांनी दिला तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अनेक जण आमच्या या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष महेश करंबेळकर यांनी व्यक्त केली.
....................
वासिंदमध्ये जलतरण प्रशिक्षण शिबिर
कल्याण (वार्ताहर) : किंडर जॉय प्री स्कूल वासिंद आणि विनायक मार्शल आर्ट फिटनेस झोन, टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घोडविंदे फार्महाउस दहागाव-वासिंद या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचे जलतरण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने या संस्थेअंतर्गत वेळोवेळी नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जात असतात. या जलतरण प्रशिक्षणात चार ते ४० वर्षे वयोगटातील जवळपास ५० हून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला. पोहणे हे शरीरासाठी किती गरजेचे आहे, तसेच त्यामध्ये असणाऱ्या वेगवेळ्या स्टाईल, स्ट्रोक आदींचे अत्यंत तर्क-शुद्ध पद्धतीचे ज्ञान येथील प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी हर्ष माळवे आणि अश्विनी जाधव यांनी दिले. या सर्व विद्यार्थांना जलतरण प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र लक्ष्मी ॲग्रो फार्महाउसचे मालक घोडविंदे, पराग काबाडी, प्रशांत ठाकरे, विजय नांगरे, रवींद्र तारमळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
...................................

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ब्राह्मण सभा, पंडितवाडी सभागृहात त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तात्याराव सावरकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तसेच ऑपेरेशन सिंदूरमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख वक्ते चंद्रशेखर साने (पुणे) यांचा स्वागत सत्कार मुकुंद बापट, सुरेश पटवर्धन व सारंग केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्रुती साठे यांनी चंद्रशेखर साने यांची माहिती सर्व श्रोतेवर्गाला करून दिली. साने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत तात्यारावांचे हिंदुत्व व हिंदू राष्ट्रवाद या विषयांवर विवेचन सादर केले. उपस्थित श्रोत्यांना संबंधित विषयांवर काही शंका प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन केल्यावर त्या सर्व प्रश्नांची संदर्भासहित मुद्देसूद उत्तरे साने यांनी दिली. हा कार्यक्रम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कल्याण व ब्राह्मण सभा, कल्याण या संस्थांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
...................
क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण आहार वाटप
कल्याण (वार्ताहर) : क्षयरोगग्रस्त रुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास औषधोपचार व आहारामुळे आजार बरे होण्याचे प्रमाण वाढते. पंतप्रधान मोदी यांनी २०२५ पर्यंत क्षयरोगाचा प्रादुर्भाव ८० टक्के कमी करणे व क्षयरोगाच्या मृत्युमध्ये ९० टक्के कमी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यास औषधोपचारासोबतच आहाराची महत्त्वाची भूमिका आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी शुक्रवारी (ता. ६) कल्याण-डोंबिवली महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अतंर्गत निक्षय मित्राकडून क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप कार्यक्रम आयोजित केला. कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या विनंतीस मान देत रोटरी क्लब ठाणे यांनी सहकार्य करून महापालिका क्षेत्रातील उपचाराखालील १०० क्षयरोगग्रस्त रुग्णांना पुढील सहा महिन्यासांठी दत्तक घेतले.
त्याचाच एक भाग म्हणूम या कार्यक्रमात क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. समाजातील सामाजिक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन निक्षय मित्र बनावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आवाहन केले. या कार्यक्रमास कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, दिनेश मेहता, सचिन भोळे, जगदीश चेलारमानी, डॉ. सोनल बांगडे, कीर्ती वडलकर, अर्चना करमटकर, ललित नेमाडे, डॉ. पौर्णिमा ढाके, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. प्रज्ञा टिके, डॉ. संदीप पगारे, डॉ. गणेश डोईफोडे, मंगेश खंदारे आदी उपस्थित होते.
...............
सायबर सुरक्षा प्रशिक्षण
डोंबिवली (बातमीदार) : पेंढारकर महाविद्यालयाच्या ग्लोबल स्टुडिओमध्ये सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मानिनी महिला मंडळ आणि वीरांगणाच्या तसेच गुगल ऑर्ग आणि द एशिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमांमध्ये ⁠सायबर हल्ल्यांचे प्रकार, ऑनलाइन खात्यांचे संरक्षण, ⁠स्मार्ट उपकरणांची सुरक्षितता, सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा, हॅकर्स पासवर्ड कसे चोरतात हे समजून घेणे,⁠ सॉफ्टवेअर अपडेट्सचे महत्त्व, ⁠फसव्या मेसेज व लिंक्स कशा ओळखाव्यात,⁠ ⁠सायबर सुरक्षा उपाय ईमेल फसवणूक ओळखणे व टाळणे, मोबाईलद्वारे कशी फसवणूक होती, मोबाईलचे फायदे-तोटे, मोबाईल कसा वापरायचा याविषयी याबाबत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान सहभागी उद्योजकांना गुगल ऑर्ग आणि द एशिया फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सुलेखा गटकळ, उमा सिंग, शुभांगी मगर आदी उपस्थित होत्या.
......................
जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण
डोंबिवली (बातमीदार) : भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि भाजप डोंबिवली पूर्व मंडळ मितेश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून एक झाड आई आणि मातृभूमीच्या नावाने लावून हा पर्यावरणदिन साजरा करणार आला. या कार्यक्रमादरम्यान नंदू परब, शशिकांत कांबळे यांनी संवाद साधत नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यास आवाहन केले. या वेळी माजी मंडल अध्यक्ष नगरसेवक मुकुंद पेडणेकर, नगरसेविका खुशबू चौधरी, प्रकाश पवार, संजीव बिडवाडकर, दिनेश दुबे, रवींद्र चौधरी, आर. पी. मिश्रा, संदीप गोसर, सूर्यकांत कदम, आनंदा अगरवाल, वंदना गोडबोले, माधवी दामले, वर्षा परमार, श्रुती उरणकर, राजू शेख, अमित टेमकर, अंकुश कुलकर्णी, भरत राठोड, सुनीता दांडेकर, हसमुख जोशी, सुनील मिश्रा, अथर्व कांबळे, यश खांडगे, सिद्धार्थ शिरोडकर, अभिषेक रायन, धनंजय गोईल, सोहम माने, रुद्र सपकाळ, वर्ष कोठारी, यश वादवाना, अमित मिश्रा, राजा सिंघानी, तुषार नेरूरकर, प्रियांशु उपाध्याय, लाजपत जाधव आदी उपस्थित होते.
.................
विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश देण्याची मागणी
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका शाळेतील वि‌द्यार्थ्यांना वेळेवर शाळेचा गणवेश व इतर साहित्य देण्याची मागणी मनसेचे ठाणकर पाडा शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गोरगरीब कुटुंबातील मुले व मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. त्यातच या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, रेनकोट, बूट, मोजे, कंपासपेटी व इतर साहित्य नियमित वेळेत मिळत नाहीत. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यांनंतर फक्त गणवेश उपलब्ध होतो. त्यामुळे याविषयी पालकांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त होत आहे. शाळा सुरू होऊन दीड ते दोन महिने झाल्यानंतर ही शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत असल्याने पालक नाराज होतात. तसेच वि‌द्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असते. त्यामुळे ही गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होताच, पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य द्यावे, अशी मागणी गणेश लांडगे यांनी केली आहे.
.......................
शहराच्या प्रवेशद्वारावर तिरंगा झेंडा उभारा
कल्याण (वार्ताहर) : कल्याण हे ऐतिहासिक शहर असून दुर्गाडी किल्ल्याजवळ पाणबुडी व टी-८० युद्ध नौका आणून या शहराचे भूषण वाढविण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मोठा राष्ट्रीय ध्वज उभारण्याची मागणी शिवसेना उपशहरप्रमुख मोहन उगले यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर आपल्या देशाचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकेल, अशा ठिकाणी लावण्यात यावा, असे कल्याणमधील जाणकार लोकांचे मत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा आदरपूर्वक विचार करून ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ या शहरात उभारलेल्या भव्य तिरंगा झेंड्याप्रमाणे झेंडा लावण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी मोहन उगले यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com