थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

औषधी रानभाज्या बाजारात दाखल
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) ः पावसाळा सुरू होताच सर्वत्र बाजारात औषधी रानभाज्यांची खरेदी-विक्री सुरू होते. कोणतेही बियाणे, खत न वापरता निसर्गाच्या सहाय्याने डोंगररांगात, शेताच्या बांधावर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या रानभाज्या विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
यावर्षी पावसाळा मे महिन्याच्या मध्यानंतर सुरू झाल्याने लवकरच रानभाज्या माळरानात उगवल्या. त्‍यामुळे मेमध्येच अलिबागच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये कुर्डू, टाकळा, शेवळा, भारंग, कंटुली, कुलू, लाल माठाचे देठ अशा प्रकारच्या विविध रानभाज्या आदिवासी महिलांसह ग्रामीण भागातील महिला बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. रानात उगविणा‍ऱ्या या भाज्या विविध विकारांवर गुणकारी असल्याचे बोलले जाते. वयोवृद्ध माणसे या भाज्या वर्षांतून एकदा तरी खाव्यात, यासाठी आग्रही असतात. या भाज्या वाटा किंवा जुडीच्या स्वरूपात विक्रीला येतात. साधारणपणे वाटा १० ते २० रुपये, तर जुडीची किंमत त्यांच्या आकारावर अवलंबून असते. यातील पालेभाज्या २० रुपयांपासून खरेदीसाठी बाजारात उपलब्ध असतात. रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, अलिबाग, उरण, रोहे, सुधागड, माणगाव आदी तालुक्यांत या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे.
..................
अलिबागमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण
अलिबाग (वार्ताहर) ः आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ व जागतिक पर्यावरणदिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माॅं के नाम’ या अभियानाअंतर्गत कार्यालयाच्या आवारामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, सहकार खात्यामधील अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच बँकाचे व पतसंस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या वेळी कार्यालयाच्या आवारामध्ये २० झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच, अलिबाग तालुक्यामध्ये कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने देऊळ भेरसे-खानाव येथे २००, आदर्श नागरी पतसंस्था १००, श्रीकृपा नागरी पतसंस्था ५०, सरखेल कान्होजी आंग्रे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था १००, गृहलक्ष्मी नागरी पतसंस्था २० व इतर संस्था ३० अशाप्रकारे एकूण ५०० झाडांचे रोपण करण्यात आले.
.............
पेण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत
पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. नुकत्याच एका घटनेमध्ये दोघा जणांना कुत्र्यांच्या टोळक्‍यांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये ते दोघेही जखमी झाले आहेत. त्‍यामुळे शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्‍त करण्यात यावा, अशी मागणी पेणकरांकडून करण्यात येत आहे. पेणमध्ये दिवसेंदिवस भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक गल्लीबोळात तसेच नाक्या-नाक्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. रात्री-अपरात्री या भटक्‍या कुत्र्यांकडून चाकरमान्यांवर हल्ला केला जातो. शहरातील देवआळी, नगरपालिका नाका, एसटी स्टँड, अंतोरा रोड, चिंचपाडा आदी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. नुकतेच या भटक्या कुत्र्यांनी येथील दोघा नागरिकांवर हल्ला चढवून त्यांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. यात एका पुरुषाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत तर एका महिलेच्या पायाचे लचके तोडल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या कामगारांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्‍यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी काँग्रेस पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
.....................
रोहे तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी
रोहा, ता. ८ (बातमीदार) ः इस्लाम धर्मात त्याग, क्षमा, समर्पण आणि शांतीच्या मार्गावर वाटचाल करण्याची शिकवण देणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात रोहा शहरात पार पडली. तमाम मुस्लिम समाजबांधव आणि भगिनींनी ईदची नमाज अदा करून एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात आणि धार्मिक तसेच पांरपरिक पद्धतीने आज शनिवारी (ता. ७) ईद साजरी करण्यात आली.
रोहा शहरातील खालचा मोहल्ला जामे मस्जिद, वरचा मोहल्ला, मस्जिद सलमान ए फारसी, अबूबकर मस्जिद, मिल्लतनगर, अष्टमी मोहल्ला व ग्रामीण भागातील न्हावे, कोकबान, सूडकोली, खैरे खुर्द, चांडगाव, कोलाड, नागोठणे, बेणसे आदी ठिकाणी पहाटे ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मौलवी यांनी खुतबा पठण करून देशभरात शांती, समृद्धी आणि मानव जातीचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने सामुदायिक दुवा (प्रार्थना) केली. ईदनिमित्त प्रत्येक मशिदीजवळ चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदनिमित्ताने तमाम मुस्लिम समाजबांधवांना खा. सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र दौडंकर, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे आदी जणांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
............
ॲड. मंगेश नेने कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित
पेण (वार्ताहर) : पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील २०२५चा कोकणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ॲड. नेने हे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, संगीत, साहित्य, उद्योग व सेवाभावी क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत असून आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता ॲड. मंगेश नेने यांना नुकतेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी बोलताना सांगितले, की माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी जो शिक्षण क्षेत्राचा वसा चालविला आहे, तोच वसा पुढे नेण्याचे काम मी करीत आहे. समाजाशी असलेली बांधिलकी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मी आजवर जोपासत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
.............
अनंत सांस्कृतिक कलामंचचा ४३वा वर्धापनदिन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील अनंत सांस्कृतिक व सामाजिक कलामंचचा ४३वा वर्धापनदिन वरचे बांधण येथील श्री शिवाईदेवीच्या मंदिरात नुकताच साजरा काण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने झाला, मान्यवरांचे स्वागत होऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत कलामंचचे संस्थापक राजन पांचाळ यांनी केले. याप्रसंगी जुईली टेमकर, हनुमान नाट्य मंडळ मेढेखार, परेश ठाकूर, मिलन पाटील यांचा अनंत सांस्कृतिक कलामंचच्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच जादूचा दिवा या बालनाट्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्त अनंत थिएटर्सच्या आगामी व्यवसायिक नाटकाची बतावणी करण्यात आली. याप्रसंगी कलाकार आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दिग्दर्शक विक्रांत वार्डे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. या कार्यक्रमाला निर्माते व दिग्दर्शक कौस्तुभ भिडे, अभिनेत्री विजया कुडव, ज्योती राऊळ, शैलेश पाटील, नितीश पाटील, बाळ सिंगासने, विकास जाधव, प्रमोद पाटील, देवेंद्र केळुस्कर, प्रतीक पानकर, योगेश पवार, जितेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील कलारसिक उपस्थित होते. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
...........
किल्ले सागरगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरातील ऐतिहासिक किल्ले सागरगडावर शुक्रवारी (ता. ६) शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली व सात ऐतिहासिक ठिकाणांवरून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सागरगड किल्ला आणि परिसराची शिवभक्तांनी स्वच्छता केली. अभिषेक विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. त्‍यानंतर आलेल्या शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. किल्ले सागरगडावरील या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन राजमुद्रा परिवार अलिबाग यांच्या वतीने करण्यात आले होते. किल्ले सागरगडावरील राज्याभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी यतिराज पाटील, अमर तुणतुणे, ओंकार म्हात्रे, देवेंद्र पालवणकर यांनी परिश्रम घेतले. तसेच या सोहळ्यासाठी कुलाबा क्रीडा प्रबोधिनी यांच्यासह अनेक शिवभक्तांचे सहकार्य लाभले.
...........
मोर्बा युनायटेड स्कूल येथे जागतिक पर्यावरणदिन साजरा
माणगाव (बातमीदार) ः युनायटेड स्कूल येथे गुरुवारी (ता. ५) जागतिक पर्यावरणदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाविषयक निर्णय घेण्याची समता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरणदिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. त्‍यामुळे या दिनाचे औचित्य साधून युनायटेड इंग्लिश स्कूल, मोर्बा यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या सरकारी, शासकीय स्थळांना सदिच्छा भेट दिली गेली. यामध्ये सर्वप्रथम माणगाव पोलिस ठाणे येथे एसआय सचिन निमकर यांना भेटून पर्यावरणाची गरज पाहता रोपे भेट स्वरूपात दिली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णालयातील डीन डॉ. अरुणा पोहरे व डॉ. अर्चना सिंग यांना सदिच्छा भेट देऊन रोपे वाटप करण्यात आली. विद्युत महावितरण केंद्र, मोर्बा येथे राहुल नवगणे, ग्रुप ग्रामपंचायत येथे सरपंच शौकत रोहेकर, मोर्बा पोस्‍ट ऑफिस सूचित हारे तसेच युनियन बँकेचे मॅनेजर अतुल शिंदे अशा विविध ठिकाणी या दिनाचे महत्त्व साधून विविध रोपे भेट स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमासाठी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहील गंगरेकर, सेक्रेटरी आमीन धनसे, खजिनदार समीर गंगरेकर, स्कूल कमिटी चेअरमन नासिर डावरे, सदस्य आमीन डावरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक डॉ. दाऊद खान, उपमुख्याध्यापक रूबिना बडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून सर्वांना जागतिक पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com