एक हजारहून अधिक शिक्षकांची वाणवा

एक हजारहून अधिक शिक्षकांची वाणवा

Published on

अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या अपुऱ्या शिक्षकांमुळे अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांमध्‍ये शिक्षकांची एक हजारहून अधिक पदे रिक्‍त आहेत. मुख्‍याध्‍यापकांचीही सुमारे ७५ टक्‍के पदे रिक्‍त असून आठ तालुक्‍यांतील शाळांमध्‍ये मुख्‍याध्‍यापकाचे एकही पद भरलेले नाही. यामुळे या शाळाही मुख्याध्यापकांविना अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषदेच्‍या अडीच हजारहून अधिक प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्‍ये मुख्‍याध्‍यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून सहा हजार २३१ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्‍यक्षात पाच हजार ५१३ पदे असल्‍याचे पाहायला मिळते. मुख्‍याध्‍यापकांची १११ पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्‍हसळा, मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन, तळा या आठ तालुक्यांत एकही मुख्‍याध्‍यापक कार्यरत नाही.
जिल्‍ह्यात इंग्रजी माध्‍यमाच्या शाळांची संख्‍या दरवर्षी वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील पालकांचाही कल इंग्रजी माध्‍यम शाळांकडे वाढल्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील पटसंख्‍या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढताना शिक्षण विभागाची ओढाताण होत आहे. ही कमतरता भरून काढण्‍यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्‍ती देण्‍याचा निर्णय घेतला होता; परंतु त्‍याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पटसंख्‍या कमी झाल्‍याने अनेक शाळांमध्ये सध्या एकच शिक्षक तीन ते चार वर्ग सांभाळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
-----------------
केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त
विद्यार्थी गुणवत्तेच्‍या अनुषंगाने केंद्रप्रमुख, शिक्षण विस्‍तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्‍हा परिषद शाळांना भेटी देणे आवश्‍यक असते; परंतु ही पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. केंद्रप्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत. त्‍यातील ५० टक्‍के म्‍हणजे ११४ पदे स्‍पर्धा परीक्षेतून भरायची आहे; परंतु मागील दोन वर्षांत स्‍पर्धा परीक्षाच झालेली नाही. त्यामुळे अनेक पदे भरण्यात आलेली नाहीत.
--------------------
प्राथमिक शाळांमधील रिक्‍त पदे
पद मंजूर पदे भरलेली पदे रिक्‍त पदे
मुख्‍याध्‍यापक १११ ३२ ८३
उपशिक्षक ५,१८४ ४,५२० ७२१
पदवीधर ९३६ ६६३ २७३

--------------------
राज्य सरकारने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांसाठी नवीन शिक्षण संच धोरण आणले आहे. या धोरणानुसार प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवी ‍या वर्गांसाठी शिक्षकांची संख्‍या कमी होणार आहे. सध्या पटसंख्येनुसार शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत. आवश्यकता असल्यास एखाद्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक भरती ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने केली जाते.
- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com