थोडक्यात बातमी नवी मुंबई
केएलईमध्ये रसायनशास्त्रासह गणित अभ्यासक्रम
नवी मुंबई ः रसायनशास्त्र आणि गणित क्षेत्रातील मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे बी.एस्सी. (रसायनशास्त्र) आणि बी.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया औपचारिकपणे सुरू करण्यात आल्या आहेत. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, उच्च शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठीही उत्तम संधी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी कॉलेजमध्ये मोफत करिअर कौन्सिलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सोयीसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांना प्रवेशासाठी अर्ज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. प्राचार्य प्रा. डॉ. विजय डी. मेंढुळकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे, की या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन रसायनशास्त्र आणि गणित यांसारख्या आधुनिक आणि करिअरपरक विषयांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा आणि महाविद्यालयाद्वारे विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी आयोजित विविध कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महाविद्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
..........
सानपाडा येथील पोस्ट ऑफिससमोर पत्राशेड
जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : सानपाडा येथील टपाल कचेरी (पोस्ट ऑफिस)समोर उभारण्यात आलेल्या पत्राशेडमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सिडकोच्या इमारतीत असलेल्या पोस्ट ऑफिससमोर नागरिकांना ऊन- पावसाचा सामना करीत आपली कामे करावी लागत होती; मात्र आता या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शेडमुळे नागरिकांची प्रमुख समस्या मार्गी लागली आहे. पोस्टात मनीऑर्डर, निवृत्तिवेतन (पेन्शन), गुंतवणूक अशी विविध कामे करण्यासाठी शेकडो नागरिक प्रतिदिन ये-जा करतात; मात्र या इमारतीतील पोस्ट ऑफिस तसेच आयओबी बँकमध्ये नियमित येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा नसणे, रांगेत उभे राहावे लागल्यास डोक्यावर छप्पर नसणे अशा विविध समस्या नागरिकांना या ठिकाणी भेडसावत होत्या. याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोस्ट ऑफिससमोर पत्राशेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे महत्त्वाची समस्या दूर झाल्याने खासकरून ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
................
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन अनधिकृत शाळा
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च, २०२५ अखेर शासनाची तसेच नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता दोन अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रात आठ अनधिकृत शाळा होत्या. त्यांची संख्या घटून आता ती दोनवर आलेली आहे. यापैकी एक शाळा सीबीडी बेलापूरमध्ये असून दुसरी शाळा नेरूळ येथे आहे. बेलापूर सेक्टर आठ, बी आर्टिस्ट व्हिलेज येथील अल मोमीन स्कूल व नेरूळ सेक्टर २७ मधील इकरा इंटरनॅशनल ॲण्ड मक्तब स्कूल, या दोन्ही शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
...............
सानपाड्यात आज अहिल्यादेवी होळकर जयंती
जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, नवी मुंबई व शिवाई महिला मंडळ यांच्या वतीने जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सानपाडा सेक्टर आठ येथील केमिस्ट भवन येथे रविवारी (ता. ८) सायंकाळी चार ते दहा यादरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर त्यांच्या जीवनकार्यावर व्याख्याते सागर मदने यांचे व्याख्यान होणार आहे. मान्यवरांच्या सत्कारासह स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य, समाजाप्रती आस्था, या कार्यप्रणालीची ओळख समाजाला होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
.................
बकरी ईदनिमित्त नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर
पनवेल (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखा व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने ईद-उल-अजहा (बकरी ईद)निमित्त गुरुवारी (ता. ५) रक्तदान शिबिर तसेच आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील दारुल अमन ट्रस्टच्या मस्जिद येथे रोटरी ब्लड बँक, क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटल, शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. तर २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवीन पनवेल येथील दारुल अमन ट्रस्टच्या मस्जिद आवारात आयोजित रक्तदान शिबिरासह आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचा शंभरहून अधिक जणांनी लाभ घेतला, तर २३ जणांनी रक्तदान केले. या वेळी दारुल अमन ट्रस्टचे ए. एम. इनामदार, अल्लाउद्दीन शेख, आसिफ कुरेशी, आरती नाईक, बगाडे काका, प्रवीण जठार, बाबासाहेब चिमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
..........
दिवाळे गावातील स्वच्छतागृहाचे लोकार्पण
तुर्भे (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्मार्ट व्हिलेज’ तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव दत्तक योजनेअंतर्गत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्मार्ट व्हिलेजकरिता नवी मुंबईतील दिवाळे गाव दत्तक घेतले आहे. नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून ‘दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज’ म्हणून बहुमान मिळालेल्या मच्छीमारांच्या दिवाळे गावचा केवळ तीन वर्षांत आमदार मंदा म्हात्रे यांनी कायापालट केला आहे. याच अनुषंगाने दिवाळे कोळीवाड्यातील मच्छी आणि भाजीविक्रेत्यांकरिता आमदार निधीतून २१ लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे लोकार्पण दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिक घनश्याम कोळी यांच्या हस्ते पार पडले. दिवाळे गावातील भूमिपुत्रांसाठी रस्ते, पाणी, सोलर हायमास्ट, आधुनिक जेट्टी, मासे विक्रीसाठी सर्व सुविधांयुक्त मासळी मार्केट, वाहनतळ, नागरिकांसाठी उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शहराच्या विकासाबरोबर मूळ गावाचा विकास व्हावा. गावातील नागरिकांचे राहणीमान आणि दर्जा उंचावण्यासाठी झालेले प्रयत्न दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने नेत आहे, असे आमदार मंदा म्हात्रे या वेळी म्हणाल्या. तर स्मार्ट व्हिलेजच्या या वाटचालीबद्दल दिवाळे ग्रामस्थांनी आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.