फळबाग योजनेतून शेतकरी होणार समृद्ध
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. यापैकी फळबाग लागवड करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जात आहे.
राज्यात मुख्यत्वे शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने तांदूळ, गहू, सोयाबीन, तूर, कापूस यासारखीच पीक जास्त घेतात. यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जातो. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी फळबाग शेतीतून उत्पन्न वाढवावे आणि राज्यातील शेतकरी समृद्ध बनेल हेच ध्येय ठेवून सरकार ही योजना राबवित असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर गेल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे पाठवताना अर्ज एकदा पाहून सबमिट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
योजनेसाठी असे आहेत निकष
- अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा शेतकरी आणि रहिवासी असणे गरजेचे आहे. पात्र अर्जदाराला योजनेचा लाभ मिळालेल्या फळबागेसाठी शेतात ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्याचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवरच आधारित आहे, त्याला योजनेच्या लाभामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
- योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाने शेती असलेला सातबारा असावा. जर शेतीमध्ये अन्यही हिस्से असतील, तर पुढील हिस्सेदारांचे संमतीपत्रक असणे गरजेचे आहे.
------------------
२१ हजार हेक्टरवर फळ लागवड
रायगड जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी या फळाची लागवड केली जाते. यामध्ये आंबा १६,२२९.८७ हेक्टर, काजू २६१०.०७ हेक्टर, नारळ १३०१ हेक्टर, सुपारी ९५४.३० हेक्टर; तर चिकू १५५.४० हेक्टर अशी एकूण २१ हजार २८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.
--------------
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करा.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.