नागली लागवडीच्या क्षेत्रात वाढ
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : रायगड जिल्ह्यात पूर्वी भातपिकानंतर खरीप हंगामात नागलीचे (नाचणी) सर्वाधिक पीक घेतले जात असे; परंतु मेहनत जास्त आणि मोबदला कमी असल्याने या पिकाचे क्षेत्र सातत्याने घटत गेले. २० वर्षांपूर्वी काही भागांतून नाहीसे झालेल्या या पिकाला २०१८ पासून सकस आहार म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. डोंगरमाथ्यावर केल्या जाणाऱ्या या शेतीतून येथील शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळू लागल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात दोन हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड केली जाणार आहे. ही लागवड मागील वर्षापेक्षा १२ टक्क्यांनी जास्त आहे.
भाताची पेरणी संपल्यानंतर सध्या नागली पिकाची पेरणी रायगड जिल्ह्यात सुरू झाली आहे. खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी हे गवतवर्गीय कुळातील पीक असून शास्त्रीय नाव इलुसिन कोरोकाना असे आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागातील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभागात पूर्वी मोठ्या प्रमाणात केली जात असे. शेती परवडत नसल्याचे कारण देत येथील शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. यात सर्वाधिक फटका नाचणी पिकाला बसला. डोंगरमाथ्यावरील नागली पिकाच्या जमिनीवर काहींनी आंबा, काजूच्या बागा लागल्याने या पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत गेले होते. २० वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने माणगाव, तळा, म्हसळा या भागात तुरळक ठिकाणी लागवड होणारे नागली पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना घरगुती वापरासाठीही पुरत नव्हते. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न देणारे बियाणे कृषी विभागाने उपलब्ध करून दिले असल्याने येथील शेतकरी हे पीक बाजारात विकून आर्थिक नफा मिळवत आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी नागली पिकासाठी १,५७२ प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. यातून पिकाची लागवड कशी करायची, शेतीचे नियोजन कसे करायचे याची माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नागली पिकाकडे आकर्षित होत आहेत.
------------
राज्यातील सर्वाधिक नाचणी पिकाचे क्षेत्र
कोल्हापूर (१६,५५४ हेक्टर), नाशिक (१५,३२६ हेक्टर), पालघर (११,६८९ हेक्टर) आणि रत्नागिरी (९,६६५ हेक्टर) या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
------
सर्वोत्तम पौष्टिक अन्न
नाचणी हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शिअमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शिअमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. रायगड जिल्ह्यातील जमीन नागली पिकासाठी उत्तम असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढविण्याकडे विशेष लक्ष कृषी विभागाकडून दिले जात आहे. हे पीक दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे.
-------
सर्वाधिक लागवड माणगाव तालुक्यात
पूर्वी जिल्ह्याच्या ६० टक्के भागात नाचणी, वरी यासारख्या धान्याची लागवड होत असे. आता निवडक तालुक्यांमध्ये हे पीक शिल्लक राहिले आहे. नागलीची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड माणगाव तालुक्यात होणार आहे. नंतर महाड, पोलादपूर, तळा, श्रीवर्धन या तालुक्यात केली जाणार आहे.
------
प्रतिहेक्टर उत्पादनात वाढ
२०१८-१९मध्ये नागलीची उत्पादकता ९९२ किलो प्रतिहेक्टर प्राप्त झाली होती. ती सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत १७५ किलो प्रतिहेक्टर अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती आता १,१४३ किलो प्रतिहेक्टर इतकी झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानंतर यात अधिकाधिक भर पडत असल्याचे दिसत आहे. नागली पिकाला बाजारपेठेतून चांगली मागणी येत असल्याने ही उत्पादकता वाढविण्यासाठी निवडक बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून केले जाणार आहे.
-----
केंद्र सरकारने नागली, बाजरी हे सकस धान्य म्हणून जाहीर करीत त्यांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीने नागलीचे उत्पादन घेतले जात असे; मात्र अलीकडे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. बाजारात मागणी नसल्याचे मुख्य कारण होते. सकस आहार म्हणून केलेल्या जनजागृतीमधून ही मागणी वाढत आहे.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी
-----
नागलीला जास्त प्रमाणात मेहनत करावी लागते. पावसाच्या लहरीपणाचाही फटका या पिकाच्या लागवडीस होतो. डोंगरमाथ्यावर पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्याचबरोबर ज्या वरकस भागात हे पीक घेतले जात असे, त्या जमिनी शेतकऱ्यांनी विकल्या आहेत.
- पांडुरंग घडशी, शेतकरी, घोसाळे विभाग
------
नाचणी पीक उत्पादनावरील दृष्टिक्षेप
जिल्ह्यातील सरासरी लागवडीखालील क्षेत्र - २,८११ हेक्टर
२०२४-२५चे सरासरी पेरणी क्षेत्र - २४९१ हेक्टर
मागील पाच वर्षांतील उत्पादकता - १,०५८ किलो प्रतिहेक्टर
२०२४-२५चे सरासरी पेरणी क्षेत्र - २,५५० हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.