

विक्रम गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : नवी मुंबई पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरी सेवा अधिक सुलभ व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत वेबसाइटमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नव्या वेबसाइटमध्ये अनेक नव्या सुविधा समाविष्ट करून ती अधिक सुरक्षित व यूजरफ्रेंडली बनवण्यात आली आहे. हे बदल नागरिकांच्या वेळेची बचत, कार्यपद्धतीतील पारदर्शकता आणि पोलिस दलाबाबतचा विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. या नव्या वेबसाइटमुळे नवी मुंबई पोलिसांची प्रतिमा अधिक सकारात्मक होत असून, इतर जिल्ह्यांसाठी ते दिशादर्शक ठरत आहे.
तंत्रज्ञानाच्या साह्याने नागरिकांना सेवा-सुविधा देण्यामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी नवी मुंबई पोलिस दल कायम अग्रेसर राहिले आहे. नवी मुंबई पोलिस दलाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देऊन पोलिस दलात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या दैनंदिन वापरामुळे पोलिसांच्या कामात सुसूत्रता व पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाइटमध्ये अनेक नव्या सोयी-सुविधा समाविष्ट करून ती अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे ही वेबसाइट अधिक यूजरफ्रेंडली झाली आहे.
----------------------
भाडेकरूंची माहिती ऑनलाइन
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सदनिका/घर भाड्याने घेणाऱ्यांची व देणाऱ्यांची माहिती नवी मुंबई पोलिसांना देण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना आपला फ्लॅट/घर भाड्याने देण्यासाठी पोलिस एनओसीची आवश्यकता भासणार नाही. त्यांना ऑनलाइन माहिती भरून पोलिसांना कळवता येणार आहे.
-----------
वेबसाइटचे नव्याने डिझाइन
वेबसाइटचा इंटरफेस आता अधिक आकर्षक, मोबाईलफ्रेंडली आणि बहुभाषिक बनवण्यात आला आहे. इंग्रजीसोबतच मराठी भाषेतही सेवा उपलब्ध असल्यामुळे अधिकाधिक नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. पोलिस भरती, जनजागृती व कार्यक्रमांची माहिती, इच्छुक उमेदवारांना पोलिस भरतीसंदर्भातील जाहिराती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया यांची माहिती वेबसाइटवर मिळणार आहे. पोलिस विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमा व उपक्रमांचा तपशीलही नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
-----------------
डिजिटल युगात पोलिस प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसिंग अधिक पारदर्शक व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच उद्देशाने लोकांना जलद, पारदर्शक आणि सहज सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ हाताळण्यास अधिक सुलभ करून देण्यात आले असून, हे संकेतस्थळ दिशा दाखवणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.