कर्जतच्या धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण

कर्जतच्या धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण

Published on

कर्जतच्या धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण
प्रशासनाकडून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन; धोक्‍याच्या ठिकाणी उपाययोजना
कर्जत, ता. १० (बातमीदार)ः सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कर्जत तालुका आपल्या निसर्गसंपन्नतेसाठी ओळखला जातो. डोंगररांगांमधून उगम पावणारे, झुलत्या धारेप्रमाणे खाली कोसळणारे धबधबे हे कर्जतच्या सौंदर्यात चारचाँद लावतात. विशेषतः पावसाळा सुरू झाला की हे धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांपासून केवळ काही तासांच्या अंतरावर असलेला हा परिसर, वर्षा पर्यटनासाठी उत्तम पर्याय म्हणून उदयास आला आहे, मात्र प्रशासनाकडून पर्यटनाचा आनंद घेताना प्रथम सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तर अनेक धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पूर्वी अनेक नैसर्गिक ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने काही ठिकाणी प्रवेशावर बंदी घातली होती. पाण्याचा अंदाज न येणे, निसरडी जमीन, खोल धबधबे यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, मात्र यंदा रायगड जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पुन्हा एकदा पर्यटकांसाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. त्‍यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विशेषतः शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांना, कर्जतमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जाणवते. चार फाटा चौक, श्रीरामपूर परिसरात वाहनांची रांग लागत असते. तसेच अनेक रिसॉर्ट येथे असल्याने आधीपासूनच वाहतुकीवर ताण असतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्या पर्यटकांनासुद्धा ट्रेनमध्ये जागा मिळवणे कठीण जाते.
............
कर्जतमधील प्रसिद्ध धबधबे आणि पर्यटनस्थळे
१. पळसदरी धबधबा
कर्जत रेल्वेस्थानकापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. मुंबई-खोपोली महामार्गावर जवळ असल्यामुळे येथे पोहोचणे सोपे जाते. रेल्वे आणि रस्तामार्गे सुलभ पोहोचता येणाऱ्या या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी हजारो पर्यटक भेट देतात.

२. आशाने धबधबा
कर्जत-कल्याण मार्गावर असलेला हा धबधबासुद्धा भिवपुरी व कर्जत या दोन्ही स्थानकांपासून जवळ आहे. येथे लहान-मोठ्या धबधब्यांचे अनेक प्रवाह असल्याने संपूर्ण कुटुंबासाठी हे आदर्श पावसाळी पर्यटन ठिकाण ठरते.

३. सोलनपाडा बंधारा (सोनपाडा डॅम)
जांबरुंग गावाजवळील सोलनपाडा बंधारा काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आला. पाण्याचे टप्प्याटप्प्याने वाहणारे प्रवाह, त्यात बसून आनंद घेणारे पर्यटक, हे दृश्य अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले. अपघातानंतर येथे काही काळ बंदी घालण्यात आली होती, मात्र आता पुन्हा पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

४. कोंढाणा लेणी
बुद्ध लेण्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी उल्हास नदीच्या उगमाजवळ सुंदर धबधबा तयार होतो. वाहन थोड्या अंतरापर्यंतच जात असल्याने एक-दोन किमी चालत जावे लागते, मात्र प्रवास थकवणारा नसून निसर्गरम्य वातावरणामुळे प्रवास आनंददायी ठरतो.
५. जुमापट्टी (माथेरानच्या पायथ्याशी)
या भागातही छोट्या-मोठ्या धबधब्यांचे दर्शन होते. माथेरानच्या सहलीबरोबर येथेही पर्यटक आवर्जून थांबतात.

वदप येथील सुभेदार धबधबा
कर्जतपासून सात किमी अंतरावर असलेल्या सुभेदार धबधबा वदप येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. छोटा आणि फॅमिली सहलीसाठी येणाऱ्यांची येथे पसंती असते.
###############
पर्यटकांनीदेखील खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. खोल पाण्यात उतरणे, निसरड्या भागात चढणे, वा प्रवाह ओलांडणे हे करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. आधी अनेक दुर्घटनांमध्ये पर्यटकांचा मृत्यू फक्त अंदाज चुकल्यामुळे झाला आहे. हवामान विभागाच्या सूचनांचा अंदाज घेऊनच पर्यटन करावे. शासकीय सूचनांचा आदर करावा, जेणेकरून जीवितहानी होणार नाही.
-धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com