नालेसफाई ९५ टक्के पूर्ण
नालेसफाई ९५ टक्के पूर्ण
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा दावा; पाणी साचल्याने प्रशासनाची पोलखोल
कल्याण, ता. १० : महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्रातील गटारे व नालेसफाईची कामे सुरू असून ९५ टक्क्यांपर्यंत ही कामे ३ जून पावसाळ्यापूर्वी झाली आहेत. नाल्याच्या पाण्यात अडथळा निर्माण होणाऱ्या स्पाँटची सफाई सुरू आहे; मात्र मोठे नाले, मध्यम स्वरूपाची गटारे डीपक्लीन झाली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभागनिहाय नालेसफाईसाठी तब्बल चार कोटी २९ लाख ८० हजार ८४६ रुपये कामे निविदा प्रक्रियेनुसार ठेकेदारांना मिळाली आहेत. तरी काही कामे बिलो टेंडरने भरून ठेकेदाराने आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. त्यामुळे ९५ टक्के नालेसफाईचा दावा दोन दिवसांत पडलेल्या पावसाने खोटा ठरवला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, ह प्रभागक्षेत्र कार्यालय डोंबिवली येथील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले, तसेच आंबिवली स्थानक पूर्व रस्त्यावरही पाणी साचले होते. त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या गटारांची सफाई वरचेवर झाल्याचे दिसते.
मोठ्या नाल्यात वरच्यावर दिसून येणारा कचरा काढण्यात आला. त्यामुळे या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नालेसफाईची पोलखोल झाली. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्याने तुंबापुरी होऊ शकते. महापालिकेची भौगोलिक स्थिती पाहता काळूनदीला जलाराम नाला, गणेश मंदिर नाला, संतोषी माता मंदिर नाला, बी. के. पेपर मिल नाला, नेपच्यून नाला येऊन मिळतात. तर मोहने एक यादवनगर नाला, मोहने फुलेनगर नाला, गाळेगाव नाला उल्हास नदी येऊन मिळतात. वालधुनी नदीला येऊन मिळणारे मोठे नाले, अंबिकानगर नाला, अंबिकानगर क्राँसिंग नाला, बंदरपाडा नाला, गौरीपाडा तलाव नाला, मिलिंदनगर नाला, खडेगोळवली नाला हे सर्व मोठे नाले बारावे जंक्शनजवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. तर कल्याणमधील जरीमरी नाला, काझीचौक नाला, डिव्हायरशेन रोड नाला ते उल्हास रिव्हर उंबर्डे वाडेघर नाला, कोलवली गंधारे एक नाला, गोदरेज पार्क नाला, लोकग्राम नाला हे थेट कल्याण खाडीला येऊन मिळतात.
डोंबिवली खाडीला खांबालपाडा, नांदवली नाला, ठाकुर्ली रेल्वे क्राँसिंग नाला, भारत भोईर कोपर गाव नाला, कोळेगाव नाला हे मोठे नाले मिळतात. तर असे लहान-मोठ्या स्वरूपाचे ९५ नाले केडीएमसी क्षेत्रात आहेत. पावसाळ्यात मोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतो. मोठे नाले व त्यांना येऊन मिळणाऱ्या छोट्या नाल्यांची सफाई न झाल्यास सखल भागात पाणी साचते. तसेच सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो.
नाल्याच्या प्रवाहात अतिक्रमण
दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईसाठी खर्च होतात. तरीदेखील सखल भागांत पाणी साचण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे प्रशासनाने नालेसफाईचे दावे केले तरी पाणी साचण्याच्या घटनांमुळे तो दावा फोल ठरतो. अतिक्रमणे, भरावामुळे नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलतो. त्यामुळे मुख्य नाल्याचा आराखडा तयार करून पाण्याचा निचरा सुरळीत कसा राहील, याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. महापालिकेचे जल, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवागुळ यांनी म्हटले आहे, की मोठ्या नाल्यांची पोकलन, जेसीबीच्या साहाय्याने सफाई केली असून ३ जूनपर्यंत नालेसफाई ९५ टक्के झाली आहे.
आम्ही काय पाहिले?
अंबिकानगर मोठा नाल्याच्या सुरुवातीला नाल्यात कचरा दिसून येत आहे. वालधुनी नदीला येऊन मिळणाऱ्या गौरीपाडा नाल्याची साफसफाई व्यवस्थित झालेली नाही. तसेच जरीमरी नाल्याच्या झुंजारराव मार्केटलगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रहेजा काँम्प्लेक्स परिसरातील नाला, सर्वादय नाला, या नाल्यात कचऱ्याचे ढीग साचल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. त्यामुळे नालेसफाईचा दावा कितपत खरा, असे चित्र यानिमित्ताने उभे ठाकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.