मुंबई उपनगरीय रेल्वेचा मृत्यूदर ३८.०८ टक्के
मुंबई उपनगरी रेल्वेचा मृत्यूदर ३८.०८ टक्के
न्यूयॉर्क, लंडन आणि फ्रान्सपेक्षा कैकपटीने जास्त; न्यायालयाने वेळोवेळी घेतली दखल
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १० ः दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी (ता. ९) घडलेल्या दुर्घटनेमुळे उपनगरी रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकल ट्रेनमधील अपघात या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने वेळोवेळी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांनी मागील वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उपनगरी रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा ३८.०८ टक्के आहे. रेल्वे अपघातातील मृत्यूदर न्यूयॉर्कमध्ये ९.०८ टक्के, फ्रान्समध्ये १.४५ टक्के आणि लंडनमध्ये १.४३ टक्के इतका असल्याचे म्हटले होते. हा जगातील सर्वाधिक मोठा आकडा असून, ही एक लज्जास्पद बाब असल्याचे उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.
लोकल रेल्वेतून लोकांना प्रवास गुरांसारखा करावा लागतो. एसी लोकल, वाढत्या प्रवासीसंख्येचा अभिमान बाळगू नका. सर्वसामान्य ज्या पद्धतीने प्रवास करतात, हे लाजिरवाणे आहे. दरदिवशी होणारे मृत्यू कसे कमी होतील त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे आदेशही तत्कालीन मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने दिले होते. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेतून २०२३ मध्ये २,५९० प्रवाशांनी जीव गमावला आहे. म्हणजे प्रतिदिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य रेल्वेवरील अपघातांमध्ये १६५० जणांचा मृत्यू झाला, तर पश्चिम रेल्वेवर ९४० जणांचा मृत्यू झाला, तर २४४१ जखमी झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला दिली होती. रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वेतून पडणे अथवा रेल्वेच्या खाबांना आदळून मृत्यू अशी उपनगरी रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत. वेळापत्रकानुसार, उपनगरी रेल्वे न येणे, अचानक रेल्वे रद्द होणे, रेल्वेचा फलाट बदलणे, कामावर उशीर होणे, एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा असणे अशावेळी प्रवासी नियम धाब्यावर बसवतात आणि जीवाला मुकतात, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
काय म्हणाले होते न्यायालय
टोकियोनंतर जागतिक स्तरावर दुसरी सर्वात व्यग्र रेल्वे यंत्रणा म्हणून मुंबई उपनगरी रेल्वेची ओळख आहे, परंतु मुंबईकर ज्या पद्धतीने रेल्वेतून प्रवास करताना ते दयनीय आहे. मोठ्या संख्येने प्रवासी असल्याची सबब पुढे करून रेल्वे प्रशासन जबाबदारी, कर्तव्य झटकू शकत नाही. तुम्ही माणसे गुरांसारखे वाहून नेता, ज्या पद्धतीने मुंबईकर प्रवास करतात ते लज्जास्पद असल्याचे ताशेरे न्यायालयाने रेल्वे प्रशासनावर ओढले. प्रत्येकवेळी तुम्ही न्यायालयाच्या आदेशावर अबलंबून राहणार आहात का, तुम्ही न्यायालयाच्या आधीच्या आदेशांचे पालन केल्याचे सांगता, तर मृत्यूबाबतचा प्रश्न अद्याप का सुटलेला नाही, मृत्यू कमी अथवा थांबवू का शकला नाहीत, अशी प्रश्नांची सरबत्तीच खंडपीठाने रेल्वे प्रशासनावर केली होती.
रेल्वे प्रशासनाची कबुली
न्यायालयाच्या दणक्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यातील आकडेवारीनुसार, २० वर्षांत उपनगरी प्रवासादरम्यान ५१,८०२ हजारांहून अधिक मृत्यू झाल्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले होते. (परे) मार्गावर २२,४८१ तर मध्य रेल्वेवर (मरे) १५ वर्षांच्या २९,३२१ एकूण ५१,८०२ हजार मुंबईकरांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे. अशी आकडेवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
वाढत्या एसी लोकलचा दुष्परिणाम
आजची घटना दुर्दैवी आहे, परंतु मध्य रेल्वेवर वाढत्या एसी लोकलचा हा दुष्परिणाम आहे. एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचे दर परवडत नाहीत. त्यामुळे एसी लोकलनंतर येणाऱ्या साध्या लोकलवर गर्दीचा भार येतो. इच्छित स्थळ गाठण्यासाठी सर्वसामान्य जीवावर बेतले असा प्रवास करतात, अशी प्रतिक्रिया रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.