

सदैव मदतीसाठी तत्पर असलेला रविकुमार ठरला अवयवदाता
पत्नी, भावाने घेतलेल्या निर्णयातून पाच जणांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सतत मदतीला धावून जाणारा, दर सहा महिन्यांनी रक्तदान करणारा, सर्वांच्या मदतीसाठी सज्ज असणारा रविकुमार आपल्या मृत्यूनंतरही पाच जणांना नवे जीवन देऊन गेला. मेंदूमृत घोषित झाल्यानंतर पत्नी आणि भावांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच कुटुंबांच्या आयुष्यात आनंद भरून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख कधीच भरून न येणारे आहे, पण तो अवयवरूपाने जिवंत असल्याचे समाधान आहे, असे रविकुमार यांचे भाऊ राजेश मुक्कू यांनी सांगितले.
चेंबूर येथील ४१ वर्षीय रविकुमार मुक्कू अंधेरीतील एका खासगी कंपनीत लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना सेवन हिल रुग्णालयात दाखल केले. सहकाऱ्यांनी त्यांच्या भावाला राजेंद्र यांना रविकुमार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. एमआरआय तपासणीत रविकुमार यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान झाले. २८ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तब्येतीत चढ-उतार सुरू राहिले. शुक्रवारी बंगळुरूतील भाऊ राजेशही मुंबईत दाखल झाला. दरम्यान, दोन ते तीन वेळा व्हेंटिलेटरची गरज भासली. २ जूनपर्यंत त्यांच्या छातीत पाणी भरले होते आणि नंतर मेंदूत पाणी भरू लागले. मेंदूतील पाणी काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर ५ जून रोजी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. यामुळे कुटुंबाने रुग्णालयाला अवयवदानाबाबत विचारणा केली. रुग्णालयाने अवयव प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून कुटुंबाची इच्छा व्यक्त केली.
सेव्हन हिलमध्ये अवयवदानाची सुविधा नसल्याने रविकुमार यांना पुढील प्रक्रियेसाठी नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचे हृदय, दोन मूत्रपिंडे, स्वादुपिंड आणि यकृत दान करण्यात आले. हे मुंबईतील यंदाचे २४वे अवयवदान ठरले. रविकुमार यांना सात आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत. ते दरवर्षी दोन वेळा रक्तदान करीत आणि समाजासाठी नेहमीच तत्पर राहत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतील, या भावनेतून पत्नी आणि आम्हा भावांनी एकत्रितपणे अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे राजेश यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.