कर्करोगाच्या लक्षणांकडे महिलांचे दुर्लक्ष
२६ लाख महिलांचे स्क्रिनिंग, हजारांहून अधिक उपचारांवर

कर्करोगाच्या लक्षणांकडे महिलांचे दुर्लक्ष २६ लाख महिलांचे स्क्रिनिंग, हजारांहून अधिक उपचारांवर

Published on

कर्करोगाच्या लक्षणांकडे महिलांचे दुर्लक्ष
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा वाढता धोका; १,०२३ जणींना निदान
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. हा कर्करोग प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (एचपीव्ही) होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी आजही महिला लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. महिला पुढाकार घेत नसल्याने स्क्रीनिंगपर्यंत महिला पोहोचतच नाहीत. त्‍यातून, चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाचा सामना करावा लागतो. योग्य माहिती आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे महिलांचे आरोग्य टिकवता येऊ शकते.
आरोग्य विभागाने चालवलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग तपासणी कार्यक्रमातून आजाराची माहिती नसलेल्या महिलांमध्ये हा आजार आढळून आला. चांगली गोष्ट म्हणजे आरोग्य विभाग या सर्व रुग्णांना उपचारांसाठी मार्गदर्शन आणि मदत करीत आहे.

गेल्‍या तीन वर्षांची आकडेवारी
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये राज्यातील २६ लाख २२ हजार २२० महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,०२३ महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यापैकी १,०१० एवढ्या महिलांवर उपचार व्हायचे आहेत. २०२३-२४ मध्ये १२,३९,९०३ महिलांची तपासणी झाली होती. त्यात ७८२ महिलांना कर्करोगाचे निदान झाले. तर, ७७२ महिलांवर उपचार व्हायचे होते. २०२२-२३ मध्ये २४,८०,५३९ तपासणी केलेल्या महिलांपैकी ३,१४२ महिलांना कर्करोगाचे निदान झाले होते तर त्यातील २,१३५ महिलांवर उपचार करण्यात आले.

तपासणीचे प्रमाण कमी
राज्याचे असंसर्गजन्य आजार या विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी सांगितले, की प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राअंतर्गत सामुदायकि आरोग्य अधिकारी आणि परिचारिका असतात. त्यांच्या माध्यमातून महिलांचे व्हीआयएस स्क्रीनिंग केली जाते. संशयित आढळणाऱ्या महिलांना उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालय स्तरावर रेफर करतो. त्यांना स्त्रीरोगतज्‍ज्ञांच्या माध्यमातून कोलकोस्कोपिक गायडेड बायोप्सी घेतली जाते. कर्करोगाचे पूर्णपणे निदान झालेल्‍या महिलांना पुढे शासकीय रुग्णालय व महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयात पाठवले जाते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी तोंडाच्या व स्तनाच्या कर्करोगापेक्षा कमी झाली आहे. या कर्करोगाच्या तपासणीसाठी महिला पुढे येत नाहीत. डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरही अनेक महिला तयार होत नाहीत.

या रुग्णालयांमध्ये उपचार
लातूरच्या विवेकानंद रुग्णालय आणि नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन कर्करोगावर उपचार देणाऱ्या रुग्णालयात उपचार केले जातात. यासह मुंबई आणि खारघरच्या टाटा रुग्णालयात पाठवले जाते.

महिलांमध्ये जागरुकतेचा प्रयत्न
या कर्करोगाविषयी जागरुकता व्हावी, यासाठी गावपातळीवर आशा आणि आरोग्य सेविकांच्या सहकार्यातून महिलांना तपासणीसाठी प्रोत्साहित केले जाते. यावर्षी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने परिचारिका, आरोग्य सेविका आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नंदूरबारच्या उपकेंद्रातील स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी १२ जूनपासून प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. अधिकाधिक महिलांची तपासणी व्हावी, हा या प्रशिक्षणामागचा हेतू आहे.

आठ परिमंडळांना ‘कॅन्सर व्हॅन’
सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत राज्यातील महत्त्वाच्या आठ परिमंडळांना एक प्रत्येकी ‘कॅन्सर व्हॅन’ दिली आहे. या व्हॅनमध्येही व्हीआयएस स्क्रीनिंगची सोय केली आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षित मनुष्यबळ या व्हॅनमध्ये असतात. ते महिलांची तपासणी करतात. ठाणे, नाशिक, पुणे, अकोला, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि लातूर या परिमंडळांना व्हॅन दिल्या आहेत.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे-
* ओटीपोटात दुखणे
* योनीमार्गात वेदना
* संभोगावेळी त्रास होणे
* योनीमार्गातून अनियंत्रित रक्तस्राव
* किडनी विकारांची लक्षणे

कशामुळे होतो कर्करोग?
* गुप्तांगाची अस्वच्छता
* असुरक्षित लैंगिक संबंध
* कमी वयात लैंगिक संबंध
* गर्भनिरोधकांचा बेसुमार वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com