रायगडचे सीएस आरोग्यमंत्र्यांकडे उसनवारी सेवेत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : जिल्हा रुग्णालयात कर्मचारी आणि डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने हे सध्या आरोग्यमंत्र्यांकडील विशेष कार्यकारी अधिकारी या उसनवारी (प्रतिनियुक्ती) सेवेत आहेत; परंतु त्यांचा पगार हा रायगडमधून दिला जात असून त्याच वेळेला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात डॉ. निशिकांत पाटील यांची प्रभारी शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. देवमाने यांची नियुक्ती ही नियमांचे उल्लंघन करून बेकायदा झाल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला असून त्यांनी या संदर्भातील तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली.
डॉ. देवमाने यांची मंत्रालयात उसनवारी म्हणून प्रतिनियुक्ती करताना जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा प्रभारी कार्यभार कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. निशिकांत पाटील यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेला आहे. डॉ. देवमाने हे ज्येष्ठता यादीमध्ये कनिष्ठ स्थानावर असून त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याने डॉ. देवमाने यांना खात्यांतर्गतच प्रखर विरोध होत आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढासळली आहे. असे असताना जिल्ह्यातील अधिकारी मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर काम करीत असल्याने जिल्ह्यातूनही त्यांच्या या नियुक्तीवर नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयातील अनेक समस्यांमुळे येथील रुग्णांना नाहक त्रास होत आहे. अपुरे डॉक्टर, रुग्णांची आर्थिक फसवणूक यासह रुग्णालयाची डागडुजीअभावी झालेली दुरवस्था अशा अनेक समस्या उभ्या असताना एका सक्षम पूर्णवेळ अधिकाऱ्याची नितांत गरज आहे. या गंभीर बाबीकडे मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष द्यावे आणि रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांच्या मूळ पदावर परत पाठवून अथवा नवीन अधिकाऱ्यांची रायगड जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्र्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
------------
मुख्यमंत्री कार्यालयाची ना हरकत न घेता नियुक्ती
डॉ. देवमाने यांच्या उसनवारी नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाची ना हरकत असणे आवश्यक आहे. डॉ. देवमाने यांच्या सेवा आदेशात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मंजुरीचा कोणताही उल्लेख आढळत नाही. राज्य सरकारचे शासन निर्णय त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर टाकणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांच्या कामकाजाबद्दलची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे ते सार्वजनिक करणे महत्त्वाचे आहे; परंतु डॉ. देवमाने यांच्या आरोग्यमंत्री यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीचा शासन निर्णय वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तसेच त्या शासन निर्णयामध्ये शासन निर्णयाचा क्रमांक अमुक असून तो शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे, असा उल्लेखही नाही. तसेच आरोग्य संचालक यांनी त्यांचा ७ फेब्रुवारी २०२५ या पत्राद्वारे रायगड जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार डॉ. निशिकांत पाटील यांच्याकडे दिला आहे, त्या पत्रातही शासन निर्णय, असा उल्लेख न करता सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेश असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयापासून लपवून ही प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचा संशय सावंत यांना आहे. त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे दाखल केली आहे.
-------------------
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था खस्ता खात असताना येथील अधिकारी मंत्रालयात उसनवारी काम करण्यास जात असतील तर ते फारच चुकीचे आहे. त्यांच्या प्रतिनियुक्तीमध्ये अनेक उणिवा आहेत, याचाच अर्थ असा होतो, की त्यांनी आपली मंत्रालयातील वर्णी बेकायदा लावून घेतलेली आहे, ती त्वरित रद्द करण्यात येऊन जिल्ह्याला एक पूर्णवेळ सिव्हिल सर्जन द्यावा.
- संजय सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ता
-----
मला मंत्रालयात येऊन पाच महिने झालेत, ही उसनवारी (प्रतिनियुक्ती) जरी तात्पुरती असली तरी सरकार असेपर्यंत ही नियुक्ती असेल. सध्या मी विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर मंत्रालयात काम करीत आहे.
- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.