पनवेलकरांची मदार खासगी रुग्णालयांवर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : कोविड काळात सरकारी आरोग्य व्यवस्थेची पोलखोल झाल्यानंतरही अद्याप पनवेल महापालिका प्रशासन या महामारीकडून शिकवण घेत नाही. शहराला दर्जेदार सरकारी सामान्य रुग्णालयाची गरज असताना पनवेल महापालिकेतर्फे इतर कामांना खतपाणी घातले जात आहे. रायगड जिल्हा शल्यचिकित्सक विभागातर्फे चालवण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे पनवेलमध्ये महापालिकेच्या सामान्य रुग्णालयाची मागणी होत आहे. असे रुग्णालय नसल्याने पनवेल परिसरात खासगी रुग्णालयांच्या तिजोऱ्या भरत आहेत.
पनवेल नगर परिषद असतानाच्या काळापासून पनवेल शहरात मुंबई महापालिकेचे केईएम आणि सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयांसारखे भव्य रुग्णालय उभारण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वांत विकसनशील शहर म्हणून पनवेल उदयास आले आहे. महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या ३० गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे या शहराची लोकसंख्या सध्या १४ लाखांपेक्षा अधिकची झाली आहे. महापालिका झाल्यानंतर अतिक्रमणांवर आक्रमण आणि मालमत्ता करामुळे खिशावर चाललेली कात्री यापलीकडे पनवेलकरांना कोणत्याच विशेष सुविधा मिळालेल्या नाहीत. रस्ते, पाणी, मलनिस्सारण या सुविधा आधी नगर परिषदेच्या काळातही मिळतच होत्या. उलट महापालिका होण्याआधी पनवेलच्या नागरिकांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारून लंगडी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पनवेलमध्ये सरकारी आरोग्य सेवेच्या नावाखाली उपजिल्हा रुग्णालयाकडे बोट दाखवले जाते; मात्र वाढत्या लोकसंख्येपुढे आणि महागड्या उपचारांमुळे हे उपजिल्हा रुग्णालय तोकडे ठरत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने शहरात दर्जेदार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारावे, अशी मागणी सामान्यांमधून जोर धरत आहे.
----------------------
‘प्रहार’कडून ५०० खाटांची मागणी
प्रहार जनशक्ती पक्षाने पनवेल महापालिकेकडे ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. पनवेल शहराची लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेने सुरू केलेले नागरी आरोग्य केंद्र, आपला दवाखाना आणि आरोग्य वर्धिनी हे उपक्रम कमी पडत आहेत. सर्वच आजारांवर आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवर माफक दरात उपचार होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना इच्छा नसतानाही खासगी रुग्णालयांत जावे लागते. अशा परिस्थितीत महापालिकेने पुढाकार घेत सरकारी रुग्णालय सुरू केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे आयुक्त मंगेश चितळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
--------------------
४५० खाटांचे माता-बाल रुग्णालय
पनवेल महापालिकेने सामान्य रुग्णालयाऐवजी कळंबोली येथे ४५० खाटांचे माता-बाल रुग्णालय सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. कळंबोली येथे महापालिकेतर्फे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाद्वारे महिलांचे आजार, प्रसूती आणि अर्भकांवर उपचार करण्याच्या सुविधा देण्यात येणार आहेत. सध्या उपचार करण्यासाठी १९ नागरी आरोग्य केंद्रे, सहा आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि दोन आपला दवाखाना अशा सुविधा देण्यात येत आहेत. माता-बाल रुग्णालयानंतर दुसऱ्या टप्प्यात महापालिकेतर्फे सामान्य रुग्णालय तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.
-------------------
उपजिल्हा रुग्णालय अपुरे
राज्याच्या आरोग्य विभागातर्फे पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय चालवण्यात येत आहे. यात भविष्यात ५० खाटा वाढवण्याचे प्रस्तावित आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, एक्सरे, रक्त चाचण्या इत्यादी सुविधा मिळत आहेत. डोळ्यांची शस्त्रक्रिया, प्रसूती आणि इतर किरकोळ शस्त्रक्रिया या ठिकाणी होतात. शस्त्रक्रियेची उपकरणे निर्जंतूक करण्यासाठी सेंट्रल स्टेरालाइज सर्व्हिसेस डिपार्टमेंटसुद्धा कार्यरत आहे. तसेच २४ खाटांचे शवागृह आहे. अतिदक्षता विभाग हा सहा खाटांचा आहे. डायलिसीस विभाग सहा खाटांचा आहे. कॅन्सर स्क्रिनिंग, दंतरोग विभाग आहे. सोनोग्राफी, मेमोग्राफी आणि एक्सरे अशा सुविधा उपलब्ध आहेत. अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, त्वचारोग उपचार हे वाराला उपलब्धत असतात. रुग्णालयात २० डॉक्टर आणि ५० पॅरामेडिकल स्टाफ आहे; मात्र बऱ्यापैकी निधी उपलब्ध नसल्याने या सर्व सुविधा सामाजिक दायित्वावर सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.