जन्म नोंदी संशयाच्या फेऱ्यात

जन्म नोंदी संशयाच्या फेऱ्यात

Published on

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : राज्यात अनधिकृत बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म नोंदणी केल्याचा संशय व्यक्त करत चार महिन्यांपासून राज्य पिंजून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (ता. ९) भिवंडी भेटीदरम्यान ५५०हून अधिक जन्म दाखले संशयास्पद असल्याची तक्रार शांतीनगर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर पालिका जन्म-मृत्यू विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिका जन्म-मृत्यू नोंद विभागाने अधिकारी नसताना जन्माला आल्यापासून ३० दिवसांनंतर नोंदीसाठी आलेल्या पाच हजार १५९ व्यक्तींचे जन्म प्रमाणपत्र दिल्याचे माहिती समोर आली आहे.
भिवंडी पालिका जन्म नोंदीनुसार २०२४ या वर्षभरात तीन हजार ३२१, तर २०२५ मे अखेरपर्यंत एक हजार ९४२ जन्म दाखले अधिकार नसताना दिले आहेत. जन्म-मृत्यू नोंद अधिनियमानुसार जन्मानंतर ३० दिवसांपर्यंत नोंद केल्यास पालिका संबंधित विभागाला जन्म दाखला देण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगीने जन्म नोंद करता येते. तर एक वर्षानंतरची जन्म नोंद ही न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने होत आली आहे. असे असताना पालिका जन्म नोंद विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षभराच्या कालावधीत ३० दिवसांआतील १५३, एक वर्षाआतील दोन हजार ७७०, तर एक वर्षानंतरच्या ३९८ जन्म प्रमाणपत्र दिले आहेत. तर १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत ३० दिवसाआतील ३१, एक वर्षाआतील एका हजार ५१६, तर एक वर्षानंतरच्या वयाच्या ३९५ जन्म नोंदी केल्या आहेत. या सर्व नोंदी अधिकार नसताना दिल्याचे समोर आले आहे.

बेकायदा मार्गाचा अवलंब केल्यास कारवाई होणार
जन्म नोंदीबाबत किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या काळातील सर्व जन्म नोंदी आम्ही तपासणार आहोत. न्यायालयीन आदेशाने झालेल्या नोंदीची पडताळणी न्यायालयामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर ज्या जन्म नोंदी बेकायदा मार्गाचा अवलंब करून केल्याचे समोर आल्यास त्याबाबत पोलिसांकडे रीतसर तक्रार देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि तसा अहवाल सरकारकडे देणार, अशी माहिती भिवंडी पालिका वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com