दोन महिन्यांत रस्त्याला उभी भेग

दोन महिन्यांत रस्त्याला उभी भेग
Published on

रोहा, ता. ११ (बातमीदार) : पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत दोन महिन्यांपूर्वी साडेचार कोटी रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला होता. हा रस्ता पहिल्याच पावसात खचून उभी भेग पडली आहे. या दर्जाहीन कामाबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करावी, तसेच संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत चार कोटी ५८ लाख ४० हजारांचा निधी खर्च करून रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे-मूठवली-शिरवली या पाच किलोमीटर रस्त्याचा अवघ्या दोन महिन्यांतच पर्दाफाश झाला आहे. विशेषतः महिसदरा नदीच्या काठाने गेलेला भाग पूर्णपणे खचला आहे. साइड पट्ट्या आणि मोऱ्यांचे कामही हलक्या दर्जाचे असल्याचे पहिल्याच पावसात उघड झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा ५०० मीटरचा रस्ता चिखलात बुडाल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला, तर या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
------------------
खड्डा बनला धोकादायक
या रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विनामूल्य भातशेतीच्या जमिनी दिल्या, तसेच अनेक वर्षांची हापूस आंब्यांची झाडेही या कामासाठी तोडण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या फार्महाउस मालकांनी सहकार्य करून जागा मोफत उपलब्ध करून आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंतीसाठी खोदलेला खड्डा उघडा ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसामुळे रस्त्याच्या अधिकाधिक भागांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
--------------------------
कामाच्या जागी संरक्षण भिंत न बांधल्याने हा रस्ता खचला आहे. या घटनेची माहिती संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे नमूद ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असताना ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली. नियोजित ठिकाणी भिंत बांधण्यासाठी नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अजून पावसाळा सुरू झालेला नाही. ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी भिंतीच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
- गोविंद शिद, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत, गोवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com