

पनवेल, ता. ११ (बातमीदार) : दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्यतेलाचे भाव सात-आठ दिवसांपासून कमी झाल्यामुळे गृहिणी खूष झाल्या आहेत. गेल्या महिन्यात १४५ रुपयांवर गेलेल्या तेलाचे भाव सध्या १३० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात हा भाव शंभर रुपयांपर्यंत यावा, अशी अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.
सध्या विविध प्रकारचे लोणचे घालण्याचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारात तेलाला चांगली मागणी असते. तेलाचे भाव वाढलेले असले तरी लोणच्यासाठी तेल आवश्यक असल्याने ग्राहकांना घ्यावेच लागते. मागील महिन्यात तब्बल १४२ ते १४५ रुपये किलोचा भाव झालेल्या सोयाबीनच्या तेलाचा भाव आता १३० रुपयांवर आला आहे. सोयाबीनसह इतरही तेलांच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. तेलाचे भाव कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच डाळींचे भावदेखील स्थिर असल्याने गृहिणींना आर्थिक नियोजन करणे सोयीचे ठरत आहे. केंद्र सरकारने तेलाच्या किमतीतील उत्पादन शुल्क १० टक्के कमी केल्याने खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. २०२३ मध्ये खाद्यतेलाच्या भावाने द्विशतक पार केले होते. मध्यमवर्गीयांनी खाद्यतेलाचा वापर कमी केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये खाद्यतेलाचे भाव हळूहळू कमी होताना दिसून आले. सर्वाधिक ग्राहक सोयाबीन तेलाचा वापर करतात. या तेलाचा भाव प्रतिकिलो १३० रुपये झाला आहे. तो आणखीन कमी व्हावा, अशी अपेक्षा ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
-------------------
डाळींचे भाव शंभरावर
खाद्यतेल स्वस्त झाले असले तरी दैनंदिन वापरात येणाऱ्या तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ यांचे भाव साधारणपणे १०० ते ११० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे सध्या गृहिणी भाजीपाल्याकडे वळलेल्या दिसून येत आहेत. डाळींच्या वाढत्या भावामुळे वर्षभर त्यांची साठवणूक तरी कशी करावी, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.
----------------------
हॉटेल व्यावसायिकांना दिलासा
खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे येथील हॉटेलचालक प्रसाद पुजारी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. हॉटेलमध्ये खाद्यतेलाशिवाय कोणताही खाद्यपदार्थ तयार होत नाही.
----------------------
किराणा मालाचे भाव (प्रतिकिलो)
सोयाबीन १३०
शेंगदाणा १५०
पामतेल १४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.