पावसाळ्यात महावितरणने सज्ज राहावे
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वीजपुरवठा सुरळीत, सुरक्षित आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद मिळावा, यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या आमदार कार्यालयात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्यांबाबत ठोस सूचना दिल्या.
बैठकीत महावितरणकडून कार्यकारी अभियंता हरीश भराडे, नेमाडे, स्वामी, प्रीतम कुमार खेडकर, विनायक लांगी आणि चेतन भोईर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी, कॅम्प १ ते कॅम्प ३ या परिसरात झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही ठिकाणी पावसामुळे उर्वरित काम थांबले आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय विजेचे खांब, ट्रान्स्फॉर्मर आणि तारांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. देखभाल व दुरुस्तीसाठी दोन खासगी एजन्सींना नेमण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सध्या उल्हासनगर शहरात सुमारे १.५ किलोमीटर वीजवाहिन्यांचे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांशी थेट संपर्क करता यावा, यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्याचे निर्देश आयलानी यांनी दिले. पावसाळ्यात नागरिकांच्या अडचणी वाढू नयेत, यासाठी तिन्ही पाळ्यांत सज्ज राहा, असा स्पष्ट संदेश आमदार आयलानी यांनी या बैठकीतून अधिकाऱ्यांना दिला.
तक्रारींसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश
आमदार आयलानी यांनी नागरिकांच्या तक्रारींचा मुद्दा ठामपणे उपस्थित करत महावितरणच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. नागरिक तक्रार करतात; पण त्यांचे फोन महावितरणकडून उचलले जात नाहीत. हा प्रकार गंभीर असून नागरिकांच्या विश्वासावर घाला आहे, असे सांगत त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागात एक कर्मचारी तक्रारींसाठी नेमावा, तक्रारीची नोंद आणि निवारणाची वेळ एका रजिस्टरमध्ये नोंदवावी, असा आदेशही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.