नशेच्या दलदलीत प्रतिष्ठित घराण्यांची पोरं!
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शहरात काही महिन्यांपासून वेगाने पसरत असलेल्या नशेच्या धोकादायक जाळ्याचा अखेर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. उल्हासनगर कॅम्प ३ येथील टर्निंग पॉइंटजवळील एका मोबाईल दुकानावर सोमवारी (ता. ९) पोलिसांनी छापा टाकत नशेच्या अड्ड्याचा भांडाफोड केला. या कारवाईत तीन तरुणांना अटक केली असून, यातील एक तरुण वादग्रस्त मोबाईल व्यापारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकेकाळी शिक्षण आणि व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहरात आता नशेचे जाळे विस्तारू लागले आहे. चिंतेची बाब म्हणजे हा नशेचा सापळा केवळ झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित न राहता थेट शहरातील प्रतिष्ठित, धनाढ्य आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबांतील तरुणांपर्यंत पोहोचला आहे. वयाच्या २० ते २८ वर्षांदरम्यानच्या काही तरुणांची टोळी उल्हासनगरमध्ये गांजा, ड्रग्ज, नशेच्या गोळ्या अशा अमली पदार्थांचे वितरण करत होती. या टोळीचे संबंध शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशीही असल्याचे उघड झाले आहे. या टोळीमधूनच तरुणांना जलद पैसा, शोभेचा आयुष्याचा आभास आणि हाय-फाय लाईफ स्टाईल दाखवून नशेच्या मार्गावर लोटले जात आहे. या प्रकरणात अटक झालेल्या मोबाइल विक्रेत्यावर यापूर्वी चोरीचे मोबाईल विकणे, सोने तस्करी व ड्रग्ज तस्करीसारखे गंभीर आरोप लागले आहेत. अनेक वेळा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, या मोबाइल विक्रेत्याचे संबंध शहरातील अनेक प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातील तरुणांशी आहेत. या संबंधातूनच तो अनेकांना नशेच्या आहारी नेत असल्याचा आरोप आहे. काही पालकांना आता आपल्या मुलांच्या बदललेल्या वागणुकीकडे लक्ष जात असून, संपूर्ण प्रकरणाचा त्यांना धक्का बसला आहे.
नशेच्या विळख्यातून शहराला वाचवा!
उल्हासनगरच्या समाजरचनेवरच नशेच्या या घातक साखळीद्वारे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीकडे सतत लक्ष ठेवणे, शाळा-महाविद्यालय प्रशासनाने सजग राहणे आणि पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू करून ड्रग्ज टोळ्यांचे समूळ उच्चाटन करणे अत्यावश्यक झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.